जि. पं.निवडणुकीसाठी : भाजपची तयारी जोरात
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून या निवडणुकीची आचारसंहिता 13 नोव्हेंबर रोजी लागू होणार असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. ही आचारसंहिता राज्यात 80 टक्के लागू राहणार आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक उमेदवारीबाबतचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीला आणखीनच रंग येणार आहे. राज्यातील 13 नगरपालिका आणि 1 महापालिका यांना आचारसंहिता लागू होणार नसली तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही. कारण सुमारे 80 टक्के गोव्यात ही आचारसंहिता लागू राहणार आहे. राज्यात 80 टक्के आचारसंहिता लागू राहणार असल्याने सरकारला कोणताही निर्णय उघडपणे जाहीर करता येणे अशक्य होणार आहे.
भारतीय जनता पक्षाने जिल्हा पंचायत निवडणूक आरक्षण जाहीर होताच उमेदवार निवडीची प्रक्रिया जोरदार सुरू केली आहे. भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत पूर्णपणे बहुमत मिळविण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी करीत व्यूहरचना आखण्यास सुरू केलेली आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण जोमाने कार्याला लागणार असून, आता केवळ निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून कधी होते, याचीच वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून तशी तयारी झाल्याचे सध्यातरी दिसत नाही.









