रु. 50 पासून 100 पर्यंत घेतली उसळी
पणजी : गणेश चतुर्थी अवघ्या तीन दिवसांवर आली असून नारळांपासून मात्र लोकांना दिलासा मिळालेला नाही. नारळाने 50 रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत उसळी घेतली आहे. दरवर्षीच्या गणेशोत्सवात महागाईला तोंड देणाऱ्या गोमंतकीयांच्या डोळ्यांत यंदाच्या गणेशोत्सवात नारळाने पाणी आणले आहे. फलोत्पादन महामंडळाने परराज्यातून आतापर्यंत दोनवेळा 50 हजार नारळ मागिवले. या 1 लाख नारळाची विक्री झालेली आहे. आणखी 25 हजार नारळ मागविण्यात आलेले आहेत. राज्यात नारळाचे उत्पादन मागणीपेक्षा कमी असल्याने नारळाचे दर वाढलेले आहेत. बाजारात 60 ते 100 ऊपये या प्रमाणे नारळाचे दर आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यातून नारळ आणून ते कमी दरात उपलब्ध करण्याचा उपक्रम महामंडळाने सुरू केलेला आहे. आज सोमवारी 25 ऑगस्ट रोजी आणखी 25 हजार नारळ गोव्यात दाखल होणार आहेत. हे नारळ 43 किंवा 45 ऊपये या दराने महामंडळाच्या केंद्रांमध्ये विक्रीस उपलब्ध असतील. महामंडळामार्फत ना फायदा ना नफा या तत्त्वावर नारळाची विक्री करत आहे. केरळ राज्यात नारळाचे दर कमी असले तरी वाहतूक खर्च अधिक होतो. त्यामुळे महामंडळ कर्नाटक राज्यातून नारळ खरेदी करत आहे. कारण कर्नाटक राज्य हे गोव्याच्या सीमेवरील राज्य असल्याने केरळच्या तुलनेत वाहतूक खर्च कमी येतो, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाय यांनी दिली.









