ऐन सणासुदीच्या दिवसात नारळाच्या दराने उच्चांक गाठला आहे. आधीच वाढती महागाई व त्यात श्रीफळ रुसल्याने गोमंतकीयांच्या गणेशचतुर्थी सणात कौटुंबिक अर्थकारण कोलमडणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून नारळाचे दर चढेच असून दिवसांगणिक ते वाढतच आहेत. गोव्याच्या बाजारपेठेत सरासरी रु. 20 ते 25 रुपयांत मिळणारा नारळ आता 50 ते 70 ऊपयांपर्यंत वाढला असून तो अधिक भडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कांदा कडाडल्यानंतर देशभरातील ग्राहकांच्या डोळ्यात जसे पाणी आणतो, त्याचप्रमाणे भडकणारा नारळ गोमंतकीयांचा जीव कासावीस करून सोडतो. नारळाचे हे भरमसाठ वाढलेले दर उतरण्याची चिन्हे नसून अजून किती दिवस तो रुसून बसणार याचा तर्क लावणेही कठीण बनले आहे.
यावर्षी नारळाच्या दरवाढीचा हा सर्वात मोठा उच्चांक असून साधारण आठ वर्षामागे अशीच परिस्थिती गोव्याच्या बाजारपेठेत ओढवली होती. विसंगती म्हणजे सणासुदींच्या दिवसात नारळाच्या दराने अत्यंत नीचांक गाठल्याचा काळही गोवेकरांनी अनुभवलेला आहे. पण यंदाचे चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. नारळ गोवा प्रदेशाचे प्रमुख उत्पादन असून येथील दैनंदिन आहाराचा एक मुख्य घटक आहे. तरीही या पिकामध्ये गोवा राज्य अद्याप स्वयंपूर्ण नाही. गोव्यातील नारळाची मागणी येथील उत्पादनावर भागत नसल्याने कर्नाटक व केरळ राज्यातून मोठ्या प्रमाणात त्याची आयात केली जाते. एकेकाळी कुणाच्या बागेत किती माड आहेत, यावर येथील लोकांची श्रीमंती गणली जायची. आज नारळाला चढे भाव असले तरी त्याचे उत्पादन वर्षागणिक अपुरे पडत आहे. श्रीफळ म्हणून देवपूजेसाठी पहिला मान असलेल्या नारळाने आता सर्वसामान्य गोमंतकीयांचे अर्थकारण विस्कटून टाकले आहे. मुळात नारळाचे दर वाढण्यामागील विविध कारणे असली तरी त्यावर तूर्त मात करणे शक्य नाही, हेही तेवढेच खरे आहे.
काही वर्षांपूर्वी माईट्स या रोगाच्या प्र्रादुर्भावामुळे गोव्यातील नारळ पिकावर मोठा परिणाम झाला होता. या रोगामुळे फळाचा आकार घटून आखूड व्हायचा. पिकही झडायचे. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना बरीच वर्षे लागली. त्यानंतर या कल्पवृक्षावर हवामान बदल व अन्य कारणांमुळे अरिष्टांची मालिकाच सुऊ झाली. गेल्या तीन वर्षांमध्ये अवेळी कोसळणाऱ्या जोरदार पावसाचा परिणाम म्हणून गेल्या वर्षी ‘बडरॉट’ म्हणजे ‘शिवडी कुजण्याच्या’ रोगामुळे मोठ्या प्रमाणात माडाची झाडे मरून गेली. सत्तरी तालुका व आसपासच्या भागामध्ये लाल तोंडाच्या माकडांनी (खेती) माजवलेल्या उच्छादामुळे नारळ झाडावर उरत नाहीत. अगदी फळाला येणारे नारळ फस्त करणाऱ्या या प्राण्यांमुळे पीक घटण्यामागील आणखी एक मुख्य कारण सांगितले जाते. अशा विविध संकटांना तोंड देणारा बागायतदार नारळाच्या उत्पादनासंदर्भात उदासिन बनला आहे. ज्या कर्नाटक व केरळ राज्यातून गोव्यात नारळाची मोठ्या प्रमाणात आयात व्हायची तेथील दरही आता आवाक्यात राहिलेले नाहीत. देशभरात शहाळ्यांना वाढलेल्या मोठ्या मागणीमुळे पक्क्या नारळाचे उत्पादन घटले आहे. केरळ राज्यातील स्थिती तर वेगळी असून तेथील बहुतेक नारळांना तेल कारखान्यामध्ये जास्त मागणी असल्याने गोव्यातील आयातीवर त्याचा परिणाम झाला आहे.
काही कृषीतज्ञांच्या म्हणण्यानुसार गोव्यातील नारळ बागायतीचे क्षेत्रफळ किंवा पीक कमी झालेले नाही. राज्यातील वाढती लोकसंख्या तसेच वर्षाकाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे नारळांचा तुटवडा भासत आहे. परिणामी मागणी अधिक चढे दर अशा कचाट्यात नारळ सापडला आहे. पिकाचे क्षेत्रफळ वाढवायचे झाल्यास नारळ हे झटपट वाढणारे पिक नसून त्याला ठराविक कालावधीच्या मर्यादा आहेत. विविध कारणांनी बागायतदारांनीही नारळ उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढती मागणी आणि मर्यादित उत्पादन अशी एकंदर विचित्र स्थिती गोव्यावर ओढवली आहे.
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर झाडावरील नारळ पाडण्याच्या हंगामाला मर्यादा येतात. साधारण जून ते ऑगस्टपर्यंत माडावरून नारळ उतरविणे शक्य नसते. याच काळात श्रावण महिन्याला सुरुवात होते व सर्व प्रमुख सणांची मांदियाळी या काळात असल्याने घरोघरी नारळाची मागणी वाढते. श्रावण संपल्यानंतर लगेच गणेशचतुर्थीला सुरुवात होत असल्याने मर्यादित नारळाची आवक दरवाढीस कारणीभूत ठरते. यंदाही काही प्रमाणात अशीच स्थिती असून चतुर्थीनंतर नारळ पाडण्यास सुरुवात झाल्यानंतर दर किंचित उतरण्याची आशा आहे. हे खरे असले तरी सध्या भडकलेले नारळाचे भाव यंदातरी स्थिर किंवा चढेच राहतील असाही काही जाणकारांचा कयास आहे. या एकंदरित परिस्थितीतून चतुर्थी सणाला गोमंतकीयांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी राज्य फलोत्पादन महामंडळातर्फे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर परराज्यातून नारळ खरेदी कऊन चतुर्थी सणात ग्राहकांना पुरवण्याची योजना आहे. फलोत्पादन महामंडळाच्या राज्यभरातील बहुतेक भाजी विक्री केंद्रावर हा नारळ विकला जाणार आहे मात्र यातून साठेबाजार व अन्य मार्गाने दलालांच्या हाती नारळ लागणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागेल.
हा तात्पुरता उपाय असला तरी वर्षभर स्वस्त दरात नारळ विकणे सरकारला शक्य नाही. त्यामुळे गोवेकरांची दैनंदिन गरज ओळखून यापुढे नारळ उत्पादनासाठी काही ठोस पावले उचलावी लागणार आहेत. कृषीखात्याने कोचिन येथील नारळ विकास मंडळाच्या धर्तीवर गोव्यातही केंद्र सुरु करण्याचा कृषी खात्याचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास नारळ उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सवलती मिळू शकतात. शिवाय नारळाच्या सुधारित जातीवर संशोधन व रोगराईसारख्या समस्यांवर आधुनिक पद्धतीने उपाययोजना होतील. कल्पवृक्ष हे तसे बहुद्देशीय आहे. त्यातून नारळाशी निगडीत अन्य उद्योगांना चालना मिळणार आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवांना आळा घालण्यासाठी नारळ पिकाची हानी करणाऱ्या माकड व अन्य वन्यप्राण्यांना ‘वर्मिन’ म्हणजेच शेतीच्या नुकसानीसाठी उपद्रवी घटक म्हणून जाहीर करण्याच्या मागणीचाही विचार करावा लागेल. ज्यामुळे नारळाच्या मुळावरील विविध समस्यांना आळा बसेल. या सर्व गोष्टींचा प्राधान्यक्रमाने विचार झाल्यास नारळापुढील येणाऱ्या आव्हानांना तोंड देणे शक्य होणार आहे.








