गणेशचतुर्थीत रु. 100 पर्यंत जाण्याची शक्यता
पणजी : नारळाचे भाव 70 पर्यंत पोहोचले असून यंदा ऐन गणेशचतुर्थी उत्सव काळात भाव प्रतिनग 100 रु. पर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. गोव्यात मोठ्या प्रमाणात माड असले तरी देखील सध्या कुळागार सांभाळणाऱ्यांना तीन मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक कुळागरात माकडासारखेच वाटणारे शेकरु नावाच्या प्राण्यांकडून कच्च्या नारळांवर आक्रमण होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोवळी शहाळी पोखरुन आतील गर खाऊन ती माडावरुन खाली फेकली जात आहेत. त्यामुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. दुसरी गंभीर समस्या आहे ती माईट्स या रोगाची. या रोगामुळे माडावरील कोवळे नारळ वाढत नाहीत. ते सुकून खाली पडतात. माडाचे आरोग्यही त्यामुळे बिघडून जाते.
तिसरी गोष्ट ही त्याहीपेक्षा वेगळी आहे व ती म्हणजे पाडेल्यांची संख्या कमी. काही कुळागारांमध्ये चांगले माड लागलेले आहेत परंतु या माडावरुन नारळ उतरवून घेण्यासाठी प्रत्येकी 100 ते 150 रुपये घेतात. शिवाय एका माडामागे 1 नारळ अशा अटी पाडेल्यांनी घातल्यामुळे बागायतदार नारळ काढण्याचे विचार सोडून देतात. या तिन्ही कारणांमुळे गोव्यातील नारळांचे उत्पादन आता घटले आहे व ते केवळ 40 टक्केपर्यंत खाली आले आहे. साहजिकच नारळांचे दर वाढलेले आहे व यंदा ऐन गणेश चतुर्थी उत्सवात प्रति नगाचा दर रु. 100 पर्यंत जाण्याची भीती नारळ विक्रेत्यांनी व्यक्त केली. गोव्याबाहेरुन सध्या मोठ्या प्रमाणात नारळ गोव्यात आणले जात आहेत. सिंधुदुर्ग तसेच कर्नाटकातून हे नारळ आणले जात आहेत. गणेशचतुर्थीला यंदा कर्नाटकातील नारळ उपलब्ध होतील मात्र भाव वाढलेले असतील.









