वृत्तसंस्था/नवी दिल्ली
खोबरेल तेल हे खाद्यतेलच आहे. त्यामुळे या तेलावर वस्तू-सेवा कर कमी लावण्यात यावा, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला आहे. आहारात या तेलाचा उपयोग करणाऱ्यांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. हा वाद गेली पंधरा वर्षे चालला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर पडदा टाकला असून या तेलाचा समावेश खाद्यतेलांमध्ये करण्याचा आदेश दिला. खोबरेल तेलाचा उपयोग केसांना लावण्यासाठीही केला जातो. तसेच काही प्रकारांच्या सौंदर्यप्रसाधनांमध्येही हे तेल उपयोगात आणण्यात येते. त्यामुळे ते खाद्यतेल मानावे की व्यापारी वस्तू मानावी, हा वाद बऱ्याच वर्षांपासूनचा आहे. वस्तू-सेवा करप्रणालीनुसार याचा समावेश खाद्यतेलांमध्ये करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे इतर खाद्यतेलांवर ज्या प्रमाणे 5 टक्के वस्तू-सेवा कराची आकारणी होते, ती खोबरेल तेलाच्या संदर्भात होत नव्हती. या तेलावर 18 टक्के वस्तू-सेवा कर लावण्यात येत आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने हे खाद्यतेलच असल्याचा निर्वाळा दिल्याने त्यावर 5 टक्के वस्तू-सेवा कर लावावा लागणार आहे.
पूर्वीची स्थिती काय होती ?
वस्तू-सेवा कर प्रणाली लागू होण्यापूर्वी खोबरेल तेलाचा समावेश प्राणीज किंवा वनस्पतीज मेद (फॅट्स्), खाण्यायोग्य मेद, प्राणीज किंवा वनस्पतीज मेण अशा श्रेणीत केला जात होता. त्यावर 8 टक्क्यांचे उत्पादनशुल्क आकारले जात होते. तर सौंदर्यप्रसाधने किंवा केसांना लावण्याच्या तेलांवर त्यावेळी 16 टक्के उत्पादन कर होता. वस्तू-सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतर या तेलाचा समावेश केसांना लावण्याच्या तेलांच्या किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या श्रेणीत केला गेला. त्यामुळे 18 टक्के कर त्यावर बसविण्यात आला. तेव्हापासून हा वाद निर्माण झाला आहे.
छोट्या बाटल्यांमधील तेलावर जास्त कर
नंतरच्या एका आदेशानुसार खोबरेल तेल जर छोट्या, अर्थात 200 मिलीलीटरपेक्षा कमी आकाराच्या बाटल्यांमधून विकण्यात येत असेल, तर ते केसांना लावण्याचे तेल मानावे आणि त्यावर 16 टक्के उत्पादन शुल्क लावण्यात यावे, असे निर्धारित करण्यात आले होते. त्यामुळे या तेलावर दोन वेगवेगळ्या दरांनुसार कर आकारणी केली जात होती. ही पद्धती बराच काळ सुरु होती.
सर्वोच्च न्यायालयाची कारणमीमांसा
एखादे तेल खाद्यतेल म्हणून उपयोगात आणले जाते तेव्हा त्याचा तो उपयोग सर्वात महत्वाचा असतो. तेच तेल सौंदर्यप्रसाधन म्हणून किंवा केसांना लावण्यासाठी कोणी उपयोगात आणत असतील तर याचा अर्थ ते खाद्यतेल नाही, असा होत नाही. त्यामुळे अधिक संख्येने लोक या तेलाचा उपयोग कोणत्या कारणासाठी करतात, हा मुद्दा महत्वाचा नाही. हे तेल किती आकाराच्या बाटल्यांमधून विकले जाते हा मुद्दाही महत्वाचा नाही. कारण खाद्यतेलही लहान किंवा मोठ्या आकारांच्या बाटल्यांमधून विकले जाते. वजन आणि मापन नियमांच्या अनुसार खाद्यतेलही 50 मिलीलीटर, 100 मिलीलीटर आदी छोट्या आकारमानाच्या बाटल्यांमधून विकले जाऊ शकते. या सर्व नियमांचा आणि प्रथांचा विचार करता खोबरेल तेल हे खाद्यतेलच आहे. त्यामुळे त्याच्यावर त्याप्रकारे वस्तू-सेवा कर आकारण्यात यावा, अशी कारणमीमांसा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.









