वार्ताहर/काकती
येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानचा दसरोत्सवातील ऐतिहासिक सीमोल्लंघनाचा सोहळा गुरुवारी थाटात पार पडला. सीमोल्लंघनाचा धार्मिक विधी होताच बंदुकीने नारळ फोडण्याचा कार्यक्रम प्रथम वसिम निसार शेख, द्वितीय सुरेश मुचंडी, तृतिय यल्लापा कोळेकर, सागर पिंगट, यल्लाप्पा मुचंडी, प्रथमेश सपकाळ, श्रीहरी पाटील, मनोहर शेखरगोळ आदी मानकरी ठरले. अनेक बंदूक नेमबाजींनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून किल्ला रस्त्याने देवाची पालखी देवस्थानचे उपाध्यक्ष शिवाजी नरेगावी, देवस्की पंच कल्लाप्पा सेमाई, यल्लाप्पा गवी, देवस्थानचे पंचमंडळ, हक्कदार, नंदीकोलसह सवाद्य मिरवणुकीने किल्ल्याच्या पायथ्याशी आले.
शिलंगणाच्या ठिकाणी पालखी आसनस्थ करण्यात आली. आपट्याच्या फांद्या, शस्त्र पूजनाच्या धार्मिक कार्यक्रमात उदयस्वामी हिरेमठ, शशीकांत जोशी यांनी पौरोहित्य केले. देवस्की पंचांनी विधीवत शस्त्रांची मांडणी केली. बसय्या पुजारी यांनी पूजन केले. पूजेचा पहिला मान वतनदार देशकती देसाई घराण्याला देण्यात आला. सत्यधर्मासाठी सीमा ओलांडणे या प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे असे सिद्धेश्वराला गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर सोने लुटून सीमेल्लंघन करण्यात आले. बंदुकीने नारळ फोडण्याचा कार्यक्रम वेळेत झाला. पावणेसहाच्या दरम्यान पहिला नारळ फोडण्यात आला. याप्रसंगी हजारो भाविकांची लक्षणीय उपस्थित होती. श्री सिद्धेश्वर मंदिराकडे पालखी प्रस्थान झाली.









