वृत्तसंस्था/ बिजिंग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या चायना खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू तसेच फ्रेंच ग्रँडस्लॅम विजेती कोको गॉफने एकेरीची तिसरी फेरी गाठताना कॅनडाच्या लैला फर्नांडिझचा पराभव केला.
दुसऱ्या फेरीतील सामन्यात गॉफने फर्नांडिसचे आव्हान 6-4, 4-6, 7-5 असे संपुष्टात आणले. गॉफ ही या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. आता गॉफचा पुढील फेरीतील सामना बेलिंडा बेनसिक आणि ऑस्ट्रेलियाची हॉन यांच्यातील विजेत्या खेळाडूबरोबर होणार आहे. डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या या स्पर्धेत अन्य सामन्यात इव्हा लिसने इलिना रायबाकीनाचा 6-3, 1-6, 6-4 तर अमेरिकेच्या केस्लरने क्रेसिकोव्हाचा 1-6, 7-5, 3-0 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. दुखापतीमुळे झेकच्या क्रेसिकोव्हाने तिसरा सेट चालू असताना सामन्यातून माघार घेतली.
या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात लोरेंझो मुसेटीने अॅड्रीयन मॅनेरिनोचा 6-3, 6-3 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तसेच लर्नर तियानने कोबोलिचा 6-3, 6-2 असा पराभव केला. आता तियान आणि मुसेटी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.









