एस.पी.चौगले, वाकरे प्रतिनिधी
वाकरे(कोल्हापूर): नियतीचा खेळ कसा असेल सांगता येत नाही, नियती जसे मानवाला अपंगत्व देते, त्याच पद्धतीने पशु-पक्षांना सुद्धा अपंगत्व देते. मात्र या अपंगत्वावर मात करून सातार्डे ता. पन्हाळा येथील कोंबडा जन्मताच एका पायाने दिव्यांग असून सुद्धा या एका पायावर आपली दिनचर्या करीत आहे. त्यामुळे मानवाप्रमाणे अपंगत्वावर मात करण्याची क्षमता पशू-पक्षात सुद्धा असल्याचे या कोंबड्याने दाखवून दिले आहे.
सातार्डे येथील सौ.सोनाबाई दिनकर बाऊचकर यांच्या घरी सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका पायाने अपंग असणारा हा कोंबडा जन्माला आला. मात्र जन्मल्यापासून अपंगत्वावर मात करून या कोंबड्याने आपली दिनचर्या सुरू केली. दिवसभर हा कोंबडा घराच्या आसपास फिरून आपली उपजीविका करीत असतो.दोन पाय असणाऱ्या इतर पक्ष्यांप्रमाणे त्याची दैनंदिन क्रिया सुरू असते.
जन्मताच एका पायाने अपंग असूनही अपंगत्वावर मात करून तो आपली वाटचाल करीत आहे. या कोंबड्याकडे पाहून अपंगत्वावर मात करण्याची प्रेरणा माणसाला मिळू शकते. केवळ एका पायावर आपली दिनचर्या चालवणारा हा आगळावेगळा कोंबडा परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे.