नायजेरियनास अटक एएनसीची कारवाई
पणजी : पोलीस खात्याच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) मंगळवारी पहाटे शिवोली येथे केलेल्या कारवाईत 4 लाख ऊपये किंमतीचे कोकेन जप्त केले असून एका नायजेरियन नागरिकाला अटकही केली आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून आज बुधवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. अटक केलेल्याचे नाव ऑगस्टिन चुकवुडी अनाफे असे असून तो मूळ नायजेरियन आहे. गेल्या काही वर्षापासून तो शिवोली येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तो ड्रग्ज प्रकरणात पुन्हा सक्रिय झाल्याचे कळताच एएनसी पोलिसांनी त्याच्या खोलीवर छापा मारला आणि त्याला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 40 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. यापूर्वी 2018 सालात त्याला एएनसीने अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून 2 लाख ऊपये किंमतीचे एलएसडी द्रव्य, कोकेन आणि गांजा यासारखे ड्रग्ज जप्त केले होते. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. तो न्यायालयीन कामकाजात हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविऊद्ध जामीन जारी केला होता. त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो पुन्हा ड्रग्ज प्रकरणात सक्रिय झाला असल्याचे पोलिसांना कळले होते. म्हणून एएनसीने सापळा रचला आणि त्याला मंगळवारी पकडले. उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांच्या नेतृत्वाखालील एएनसीचे हवालदार कमलेश देसाई, प्रमोद कलंगुटकर, कॉन्स्टेबल प्रशांत सुतार, मंदार नाईक आणि साईराज नाईक यांनी एएनसी निरीक्षक सजीथ पिल्लई यांच्या देखरेखीखाली छापा टाकला. या छाप्याचे निरीक्षण उपअधीक्षक एएनसी नेरलॉन अल्बुकर्क व एएनसी अधीक्षक शिवेंदू भूषण यांनी केले. या प्रकरणाचा अधिक तपास महिला उपनिरीक्षक प्रियंका गारोडी करत आहेत.








