ब्राझीलहून आणले 1,922 ग्रॅम अमली पदार्थ, गुप्तचर पथकाची दिल्ली विमानतळावर कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दिल्ली विमानतळावर 26.5 कोटी ऊपयांचे 1,922 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे अमली पदार्थ ब्राझीलमधून कुरिअरच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. नवी दिल्लीतील न्यू कुरिअर टर्मिनलवर सुरू असलेल्या तपासणीदरम्यान डीआरआय अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. साओ पाउलो या नावाने ब्राझील येथून दोन बॉक्समध्ये साहित्य पाठविण्यात आले होते. सदर बॉक्समध्ये सजावटीच्या वस्तू असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, या साहित्याबाबत संशय आल्याने अधिक तपासणी केली असता त्यातील काही बॉक्समध्ये थर्माकोल बॉलमध्ये कोकेन लपविल्याचे स्पष्ट झाले. थर्मोकोलचे काही बॉल्स इतर बॉल्सपेक्षा थोडे जड होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. थर्माकोलचे सर्व बॉल्स तपासल्यानंतर 10,000 बॉल्सपैकी 972 बॉल्समध्ये पांढऱ्या पावडरने भरलेले पॉलिथिनचे गोळे असल्याचे आढळून आले. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे एकूण वजन 1,922 ग्रॅम इतके झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील याची किंमत 26.5 कोटी रूपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









