आरोपीचे ट्रान्सफर वॉरंट मिळण्याची मागणी तळबीड पोलिसांनी केलीये
उंब्रज : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील कोकेन प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या हालचाली तळबीड पोलिसांनी सुरू केल्या असून त्यासाठी कराड न्यायालयात धाव घेतली आहे. या आरोपीचे ट्रान्सफर वॉरंट मिळण्याची मागणी तळबीड पोलिसांनी केली आहे.
मुख्य संशयित हातात आल्यानंतरच तासवडे एमआयडीसीतील सूर्यप्रभा फार्माकेम कंपनीचे सीलबंद कुलूप पुन्हा तळबीड पोलिसांना काढता येणार असून त्यानंतर तपासाला गती मिळणार आहे. दरम्यान अटकेत असलेल्या एकाचा मुक्काम उंब्रज येथे होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपासाच्या अनुषंगाने सध्यस्थितीत तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातून मुख्य आरोपी ताब्यात घेणे व फरारी असलेल्या अन्य संशयितास पकडणे ही दोन्ही आव्हाने तळबीड पोलिसांसमोर आहेत. कोकेन प्रकरणात तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यासाठी तळबीड पोलिसांनी ट्रान्सफर वॉरंट मिळावे म्हणून कराड न्यायालयात धाव घेतली आहे.
तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी, जोपर्यंत तळबीड पोलीस ठाण्याच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत येथील पोलिसांना तपास करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातील आरोपी ताब्यात घेणे व फरारी आरोपीचा शोध घेणे हा तळबीड पोलिसांचा मुख्य अजेंडा असून या प्रकरणातील अन्य संशयित व इतरांवर पोलीस यंत्रणा सध्या नजर ठेवून आहे.
तांत्रिक तपास चालू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी सांगितले. फरार आरोपीचा सातारा जिह्यासह इतर आजूबाजूच्या जिह्यामध्ये तपास सुरू आहे. तासवडे औद्योगिक वसाहतीतील सूर्यप्रभा कंपनी कोकेन प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी सील केली आहे. शनिवार 24 मे रोजी सदर ठिकाण सीलबंद करून संशयित आरोपीला घेऊन तेलंगणा पोलिसांची टीम पुन्हा माघारी फिरली होती.
तसेच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी लावलेले कुलूप तोडून तेथे तेलंगणा पोलिसांनी त्यांचे कुलूप लावल्याने या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाले. तपासासाठी आलेल्या तेलंगणा पोलिसांच्या टीमने तासवडेतील एका हॉटेलवर मुक्काम केला असून तपासकार्यात अतिशय गोपनीयता पाळली आहे.
सूर्यप्रभा फार्माकेम कंपनीचा मालक अमरसिंह जयवंत देशमुख याने तेलंगणा पोलिसांना काय माहिती दिली. कोकेन प्रकरणाचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, हे देशमुख यास ताब्यात घेतल्यानंतरच उघडकीस येणार आहे. सध्यातरी अमरसिंह देशमुखचे कोकेन तेलंगाणा पोलिसांच्या हाती लागले कसे व तो तेलंगाणा पोलिसांच्या तावडीत कसा अडकला, याचे उत्तर मिळू शकलेले नाही.
अटकेतील तिघांना आज न्यायालयात हजर करावे लागणार
या प्रकरणी कंपनीमधील समीर सुधाकर पडवळ (रा. मलकापूर), रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ, ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवडे, ता. पाटण) यांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांना न्यायालयाने बुधवारी 28 पर्यत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यामुळे आज पुन्हा या संशयितांना न्यायालयात हजर करावे लागणार आहे. मुख्य संशयित व कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव ता. जि. सातारा), एनडीपीएस गुन्ह्यामध्ये तेलंगणा पोलीस यांच्या कोठडीत आहे. विश्वनाथ शिपनकर (रा. दौड) हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.








