काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
वृत्तसंस्था / धनबाद
झारखंडमध्ये अवैध खाण खोदकाम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धनबादच्या झरिया भागातील भौरन कोळसा खाणीत शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. स्थानिकांच्या मदतीने तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर ऊग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात एका 10 वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला. मृत आणि जखमींची नेमकी संख्या निश्चित केली जात असल्याची माहिती डीएसपी अभिषेक कुमार यांनी दिली.
अवैध उत्खननादरम्यान शुक्रवारी सकाळी खाणीचा बराच भाग कोसळल्यामुळे अनेक लोक गाडल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटना घडताच अवैध खाणकाम करणारे काही लोक घटनास्थळावरून पळून गेले. धनबाद परिसरात पहाटेच्या वेळी शेकडो लोक अवैध उत्खनन करतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बचावकार्य सुरू असून मृतांच्या संख्येबाबत सध्याच काहीही सांगणे घाईचे ठरेल, असे भौरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद ओराव यांनी सांगितले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची ओळख पटली असून 10 वषीय जितेंद्र यादव आणि 25 वषीय मदन प्रसाद यांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अजून किती जण खाणीत गाडले आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही.
झारखंडमध्ये यापूर्वीही अशाप्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. तथापि, अवैध खाणकामामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी उपलब्ध करून दिली जात नाही. अनेकवेळा अपघातात सर्वस्व गमावलेले कुटुंबीयही कायदेशीर कारवाईच्या भीतीने गप्प बसतात. यावषी जुलैमध्ये एनजीटीचा अहवाल आला होता. या अहवालात धक्कादायक खुलासे झाले आहेत. 41 वर्षे जुन्या बंद पडलेल्या कोळसा खाणीत अजूनही अवैध उत्खनन सुरू आहे.









