डीसीआरबी विभागाची कारवाई : इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर
प्रतिनिधी /बेळगाव
गोकाक परिसरात झालेल्या परीक्षा घोटाळा प्रकरणी आणखी एका कोचिंग सेंटरच्या मालकाला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. केपीटीसीएल परीक्षेसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून गैरप्रकार करण्यात आले होते.
बाळेश केंचाप्पा कट्टीकार (वय 26, रा. राजापूर, ता. मुडलगी) असे त्याचे नाव आहे. डीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक विरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी बाळेशला अटक केली आहे. या प्रकरणानंतर तो फरारी होता. शुक्रवारी अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
बाळेश हा गोकाकमध्ये अगस्त्य कोचिंग सेंटर चालवितो. 7 ऑगस्ट 2022 रोजी केपीटीसीएल ज्युनिअर असिस्टंट पदासाठी झालेल्या परीक्षेत 17 हून अधिक परीक्षार्थींना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करून त्याने प्रश्नांची उत्तरे दिली होती. यापूर्वी अटक करण्यात आलेले संजीव भंडारी, मंजुनाथ माळी, श्रीधर कट्टीकार आदींसमवेत हात मिळवणी करून बाळेशने इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, मायक्रो चीप, परीक्षा केंद्रात पाठविले होते.









