पुणे / प्रतिनिधी :
सरत्या 2022-23 च्या गाळप हंगामात गाळपासह उच्चमत साखर उत्पादन व उताऱ्यात टॉप टेनमध्ये सहकारी साखर कारखान्यांनीच आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
याबाबतचा अहवाल साखर आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यातून ही बाब अधोरेखित झाली आहे. या अहवालानुसार, यंदा 210 कारखान्यांनी गळीत घेतले असून, एकूण 1052 लाख मे. टन इतके गाळप घेण्यात आले. यामध्ये उच्चतम गाळप, उतारा व साखर उत्पादनात खासगीपेक्षा सहकारी कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र आहे. गाळपाचा विक्रम सोलापुरातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या नावावर नोंदला गेला असून, या कारखान्याने सर्वाधिक 18 लाख 41 हजार 421 मे. टन गाळपाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. याशिवाय कोल्हापूरचा जवाहर सहकारी साखर कारखाना, तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर व ज्ञानेश्वर सहकारी तसेच दत्त सहकारी साखर कारखान्याचाही या टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.
साखर उत्पादनात कोल्हापूरच्या जवाहर कारखान्याला अग्रस्थान
कोल्हापूरच्या जवाहर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याने 22 लाख 7 हजार 70 क्विंटल इतकी साखर उत्पादित केली. याशिवाय सोलापूरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना, तात्यासाहेब कोरे कारखाना, सोमश्वर, माळेगाव, दत्त व भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्यानेही साखर उत्पादनात पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे.
साखर उताऱ्यात कोल्हापूरच्या पंचगंगाला प्रथम क्रमांक
कोल्हापूरच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने 12.86 टक्के उताऱयासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच टॉप टेनच्या यादीत राजारामबापू कारखाना, कुंभी कासारी, दूधगंगा वेदगंगा, सहय़ाद्री, भोगावती, उदयसिंगराव गायकवाड कारखाना, विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याचाही समावेश आहे.
लाल मातीच्या भागात चांगला उतारा
बहुतेक कारखाने हे डोंगरभागातील आहेत. लाल माती असलेल्या भागांतील कारखान्यांचा साखर उतारा चांगला असल्याचे निरीक्षणही याबाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोंदविले.
सोलापूरला उतारा कमी, संशोधनाची गरज
दरम्यान, सोलापूरमध्ये मात्र साखर उताऱ्यात सातत्याने घट होत असल्याकडे लक्ष वेधले असता साखर आयुक्तांनी याबाबत कबुली दिली. त्याबाबत संशोधनाची गरज असल्याचेही त्यांनी मान्य केले.
महाराष्ट्राची वाटचाल ब्राझीलच्या दिशेने
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मिती करण्याची वार्षिक क्षमता 226 कोटी लिटर्सवरून 244 कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. तेल विपणन कंपन्या इथेनॉलचा पुरवठा केल्यावर 21 दिवसांत कारखान्यांना पेमेंट करीत असल्याने कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी अर्थसाहय़ही देण्यात येत आहे. त्याचेही सकारात्मक परिणाम होत आहेत. इथेनॉल निर्मितीकडे कारखान्यांचा कल वाढत असून, महाराष्ट्राची वाटचाल आता ब्राझीलच्या दिशेने सुरू झाली असल्याचे साखर आयुक्तालयाच्या अहवालात म्हटले आहे.








