ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनच्या तीन नेत्यांच्या शिष्टमंडळाने काही वेळापूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर तासाभरातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याकरवी संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर या असा निरोप दिला.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून, संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिली आहे. त्यामुळे या जागेचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. इतर पक्षांकडून पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा संभाजीराजे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र शिवसेनेत प्रवेश केला तरच त्यांना उमेदवारी देता येईल अशी अट शिवसेनेने घातली होती. त्यावर दोन दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा, अशी मागणी संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. दरम्यान, काही वेळापूर्वी शिवसेनेच्या अनिल देसाई, उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर या नेत्यांच्या शिष्टमंडळाने संभाजीराजे सध्या मुक्कामास असलेल्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतली. त्यानंतर तासाभरातच संजय राऊत यांनी संभाजीराजेंना फोन करुन उद्धव ठाकरेंचा निरोप दिला. त्यामुळे संभाजीराजे उद्या मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार का, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.