ऑनलाईन टीम तरुण भारत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची औरंगाबाद येथे आज सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. मात्र राज यांनी औरंगाबाद येथे सभा होणार असल्याचे जाहीर केल्या पासून राज यांच्यावर टीका होत आहे. अनेकांनी त्यांच्या या सभेला विरोध करत त्यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर आता स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरेंवर टीका केलीये. ‘असे खेळ खूप पाहिलेत, असे खेळ करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही’, तसेच असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिलेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला हाणला.
मशिदीवरील भोंग्यांवरुन राज्यातील राजकारणात खळबळ माजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज 1 मे रोजी औरंबादेत मोठी सभा आहे. मात्र, त्यांच्या या सभेवरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. तर लोकसत्तेने घेतलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर खरमरीत अशी टीका केली. अशा खेळाडुंकडे मी लक्ष देत नाही, हे खेळाडू नेमक्या कोणत्या-कोणत्या मैदानैत कोणते-कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत.
भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले…
पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले आहेत अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली.
करमणूक फुकटात मिळत असले तर का नाही पाहायची…
तसेच दोन वर्षांचा कालखंड फार मोठा होता. यादरम्यान सर्व बंद होतं. मग करमणूक फुकटात मिळत असले तर का नाही पाहायची असंही ते म्हणाले. शिवसेनेला ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष, मला ते लपवायची गरज नाही आणि मी ते करणारही नाही. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे, नाही पसंत पडलं तर परत करा, तसं हे तुमचं फळलं तर फळलं नाहीतर परत, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली.