मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही कर्तृत्ववान समजत होतो पण ते आता साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर निघाले आहेत. आम्हाला प्रतिटन दुसरा हप्ता 400 रुपये पाहीजे आणि तो आम्ही मिळविल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमाऩी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
काल कोल्हापूरात शेतकरी संघटनेचे नेते आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मागली हंगामातील 400 रूपये प्रतिटनाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यांची धुरांडे पेटू देणार नसल्याचा इशारा दिला होता. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार नाही केला तर यापुढील आंदोलन सविनय मार्गाने होईल याची खात्री देणार नाही असा दमही त्यांनी राज्य सरकार बरोबर साखर कारखानदारांना दिला होता.
आज राजू शेट्टी यांनी एक व्हिडियो जारी करून मुख्यमंत्र्यांवर टिका केली. ते म्हणाले, “साखर उद्योगाचे या वर्षीचे धोरण ठरवण्यासाठी राज्य शासनाने बोलवलेल्या बैठकीला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही कर्तृत्ववान मुख्यमंत्री समजत होतो. पण ते आता साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर निघाले असल्याचे दिसून येत आहे. एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात शासन निर्णय व्हावा याबाबत आम्ही अनेकवेळा त्यांचे उंबरे झिजवले मात्र साखर कारखानदारांच्या दबावामुळे अद्याप याबाबत शासन निर्णय नाही.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, “मुख्यमंत्र्यांच्या मनात काहीही असले तरी त्याचा उपयोग नाही कारण साखर सम्राटांना जे धोरण हवे आहे तेच राबवण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस त्याला फक्त म..म म्हणणार आहेत. या समितीच्या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही.”असे म्हटले आहे.
शेवटी बोलताना त्यांनी, “साखरेचे चढे भाव, इथेनॉलच्या माध्यमातून मिळवलेला पैसा यातून मिळवलेला पैसा साखर कारखानदारांकडे शिल्लक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात कित्येक वेळा पटवून सांगण्यात आले आहे. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्हाला प्रतिटन दुसरा हप्ता 400 रुपये हवा आहे आणि तो आम्ही मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही” असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.








