राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळापूर्वीच कोल्हापुरात दाखल झाले. कणेरी मठ येथील गोशाळेच्या आयव्हीएफ केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री कोल्हापूरात आल्याची माहिती लागताच कोल्हापूरातील सकल मराठा समाज आणि आंदोलक कणेरी मठाकडे जाण्यासाठी प्रयत्नात असताना पोलीसांनी त्यांना थांबवले. आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाच्या कोल्हापुरच्या मराठा आंदोलकांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मारला.
या दौ-यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणावर भाष्य केले. ते म्हणाले “मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकार नक्कीच करेल. मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी- मराठा मागणीचा अभ्यास सुरू आहे. त्यानुसार कुणबीसाठीचे जुने पुरावे हैदराबादमधून मिळाले आहेत.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी “नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळेल. मराठा समाजाला हक्काचे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळायला हवं. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल मराठा समाजाने उचलु नये. सोमवारी उपसमिती आरक्षणासाठी बैठक आहे. आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे थोडेसे सरकारला समजून घ्यावे. मनोज जरांगे- पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यायला हवी.” असे आवाहनही त्यांनी केले.








