ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल सकाळ माध्यम समुहाला मुलाखत दिली. या मुलाखतीत मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर अचानक पुण्याच्या कोथरुड परिसरात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… अजित पवार असे बॅनर झळकले. कोथरुड हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ असल्याने या परिसरातील हे बॅनर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, काल झालेल्या मुलाखतीत 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच काय आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची तयारी आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घ्यायला मला 100 टक्के आवडेल, असे म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा मनसूबा जाहीर केला. त्यानंतर अचानक पुण्याच्या कोथरुड परिसरात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री…अजित पवार असे बॅनर लागले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या दीपाली संतोष डोख यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर अजितदादांचा मोठा फोटो आहे. त्यावर जनेतच्या मनातील मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू … अजित पवार असा उल्लेख आहे. या बॅनरवर डोख यांचे फोटोही आहेत.
अधिक वाचा : गुणांकन कार्यपद्धतीचे अचूक नियोजन करा; उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश








