ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या आशिर्वादाने मी आज मुख्यमंत्री आहे. ही लढाई सोपी नव्हती. सत्तेसाठी आम्ही बंड केलं नाही. 50 आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवणं ही सोपी गोष्ट नव्हती. ही एक ऐतिहासिक घटना आहे. जगातील 13 देशांनी त्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
पंढपूरमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शिदे म्हणाले, सभागृहात मी कमी बोललो. पण वेळ आल्यावर सगळं सांगेन. बाळासाहेबांच्या विचारांशी आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही. टीका करणे हे माझ्या स्वभावात नाही, त्यामुळे मी कामातून उत्तर देईन. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी ठाम उभे आहे. आपल्याला सरकारची प्रतिमा बदलायची आहे. मी २४ X ७ काम करणारा मुख्यमंत्री आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी जनतेचा सेवक आहे. याच भावनेने आपल्याला काम करायचे आहे. शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ देणार नाही. सत्तेचा फायदा शिवसैनिकांला कसा होईल, याकडे विशेष लक्ष देईन.
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास आराखडा तयार करणार
पंढरपूरच्या विकासासाठी सरकार कठिबद्ध आहे. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. पंढरपुरात वारकऱ्यांसाठी चांगलं आणि आरोग्यदायी वातावरण असलं पाहिजे. त्यासाठी ज्या सोईसुविधा हव्यात, त्या सरकारकडून उपलब्ध केल्या जातील, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
हेही वाचा : शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस








