Satara News : सर्वसामान्य माणूस आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या 6 महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल. त्याचबरेाबर पर्यटन वाढीलाही जिल्ह्यात चालना देण्यात येईल. त्यादृष्टीने सूक्ष्म आराखडा तयार करून नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील.पर्यावरणपुरक विकास हे तत्त्व अंगिकारण्यात येऊन त्यादृष्टीने सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत संस्थाचे सदस्य पाशा पटेल, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वनसंरक्षक भारद्वाज, सामाजिक वनीकरण विभागाचे वाघमोडे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थिती होती.









