पुणे / प्रतिनिधी :
भाजपच्या हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ येत्या 24 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी तीनच्या सुमारास कसबा विधानसभा मतदारसंघात रॅली होणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातून पुरविलेली रसद, कसब्यातील बैठकांचा सपाटा, मेळावा यानंतर आता थेट रॅली होणार असून, कसब्यात भाजपासोबत मुख्यमंत्र्यांनीही मोठी ताकद लावल्याचे दिसत आहे.
कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या सबंध देशाचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी काँग्रेसने रवेंद्र धंगेकर यांना तिकीट देऊन चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे रासने व धंगेकर यांच्यातील लढत अतिशय अटीतटीची होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाची सर्व यंत्रणा निवडणुकीत उतरलेली असताना मुख्यमंत्र्यांनीही पूर्ण ताकद लावल्याचे दिसत आहे. आता रॅलीद्वारे मुख्यमंत्री हा मतदारसंघ ढवळून काढणार आहेत.
याबाबत म्हस्के म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेना निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी विविध समाजातील नागरिकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नागरिकांनी अनेक व्यथा मांडल्या. त्या सोडविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आजपर्यंत विविध समाजाची मंडळींची बैठक कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. ती बैठक घेण्याच काम एकनाथ शिंदे यांनी केल्याने नागरिक समाधानी आहेत, असे सांगत म्हस्के यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
अधिक वाचा : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट
पुण्यात महाविकास आघाडीत लवकरच राजकीय भूकंप होणार
ठाकरे गटाचे उर्वरित आमदार आणि खासदार हेदेखील लवकरच आमच्याकडे येतील. त्या सर्वांना किंवा आजवर आमच्याकडे आलेल्या नेत्यांना कोणत्याही पद्धतीचे आमिष दाखविले गेलेले नाही. तसेच आता कसबा पोटनिवडणुकीनंतर पुण्यातील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत मोठय़ा प्रमाणावर राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत म्हस्के यांनी वर्तविले.








