कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही
ऑनलाईन टीम/तरुण भारत
आम्ही केलेलं बंड हे गद्दारी नाही. आम्ही अन्यायाविरोधात केलेला हा उठाव आहे. बाळासाहेबांनीच आम्हाला अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा विचार दिला आहे. महाराष्ट्रातील लोकांना हवे असलेले सरकार आम्ही स्थापन केले, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी आज केला. तसेच, आम्हीच शिवसेना आहोत. विधिमंडळात शिवसेना (Shivsena) पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केला. तर, आषाढी वारीनंतर खातेवाटपावर चर्चा होईल, असंही सांगण्यात आलं.
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा आरोप चुकीचा आहे. काहीजण जनतेची दिशाभूल करत आहेत. शिवसेनेचा कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. कामाच्या निमित्तानं भेटीगाठी होत असतात. नवीन सरकार स्थापन झाल्याने दिल्लीतील नेत्यांची आम्ही सदिच्छा भेट घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि भाजपने सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे दिल्लीत गेले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. तर, आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), भाजपाचे राष्ट्रीय अ्ध्य़क्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.
यादरम्यान शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार होते. ही सदिच्छा भेट असून केंद्राचे सहकार्य आणि आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने ही भेट होती, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपाने एकत्रितपणे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविली होती. नागरिकांनीही या भरघोस मतदान करून युतीला विजयी केले होते. हा जनादेश ओळखून त्यांना हवे असलेले सरकार आम्ही स्थापन केले आहे. हे सरकार अडीच वर्षे टिकेल. यापुढेही एकत्र निवडणूक लढवून जिंकूही असे, मुख्यमंत्री म्हणाले.