थराली येथे मोठी आपत्ती : 80 घरांमध्ये भरला गाळ-माती, दुकाने, बाजारपेठेचीही हानी
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील चमोली जिह्यातील थराली येथे शुक्रवारी रात्री उशिरा ढगफुटी झाली. ही घटना मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान घडली. या आपत्तीमुळे जवळच्या दोन गावांमध्ये पाणी आणि गाळ घुसल्यामुळे सागवारा आणि चेपडोनमध्ये मोठे नुकसान झाले. स्थानिक नद्यांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने दोन्ही गावांमध्ये हाहाकार उडाला. या आपत्तीनंतर मदत व बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गेल्या 18 दिवसांत उत्तराखंडमध्ये ढगफुटीची ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. याआधी 5 ऑगस्ट रोजी धराली येथे ढगफुटी झाली होती. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोक बेपत्ता झाले होते.

थराली तालुका मुख्यालयाच्या एक किलोमीटरच्या परिघात अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाल्याचे चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले. चेपडोन गावात एक व्यक्ती बेपत्ता आहे, तर सागवारा येथील एका घरावर पडलेल्या ढिगाऱ्याखाली एक मुलगी गाडली गेली. काही तासांनंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोन्ही गावांमधील एकूण 70-80 घरे 2 फूट उंचीपर्यंत ढिग्रायांनी झाकली गेली आहेत. तसेच बाजारपेठेतील दुकाने आणि व्यापारी गाळ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मिंग गधेराजवळ थरालीला जोडणारा कर्णप्रयाग-ग्वालदम राष्ट्रीय महामार्ग मातीच्या ढिगाऱ्यांमुळे बंद झाला आहे.
एकीकडे ढगफुटीची आपत्ती घडलेली असताना हवामान खात्याने शनिवारी उत्तराखंडसह 19 राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग-305 सह 347 रस्ते अजूनही बंद आहेत. येथे 20 जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत 295 जणांचा मृत्यू झाला आहे.









