पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प
बेळगाव : हिरेबागेवाडी परिसरात मंगळवारी रात्री 8 च्या दरम्यान ढगफुटीसदृश पाऊस झाला. जवळपास दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय मार्गावरील हिरेबागेवाडी जवळच्या बडेकोळमठ घाटात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे बेळगावहून धारवाडकडे जाणारी वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुद्रेंश होळेन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालविले होते.
मंगळवारी दिवसभर उघडीप होती. मात्र वातावरणात प्रचंड उष्मा होता. सायंकाळी 7 च्या दरम्यान शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. इतकेच नव्हे तर ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळमठजवळील घाटात ढगफुटीसदृश पाऊस झाला. जवळपास दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येणेदेखील कठीण झाले. घाटातून येणारे पाणी
एका बाजूच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात तुंबून राहिले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. केवळ धारवाडहून बेळगावकडे येणारी वाहने ये-जा करीत होती. महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाल्याचे समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री 8 नंतर पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे महामार्गावरील पाणीदेखील हळुहळू कमी झाल्याने धिम्यागतीने धारवाडकडे जाणारी वाहतूक रात्री 9 नंतर मार्गस्थ झाली. मात्र वाहनचालकांनी खबरदारी बाळगत वाहने चालवावीत, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
2019 मध्ये आलेल्या महापुरावेळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने ठप्प झाला होता. त्यामुळे कोल्हापूर ते बेळगाव वाहतूक व्यवस्था काही दिवस कोलमडली होती. मध्यंतरीदेखील तवंदी घाटात पावसाचे पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पहिल्यांदाच बेडेकोळमठजवळ पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प होण्याची ही पहिलीच घटना आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत.









