यल्लम्मा मंदिरात शिरले पाणी : नागरिकांची उडाली तारांबळ : वाहने वाहून जाण्याचा प्रकार
वार्ताहर/बाळेकुंद्री
सौंदत्ती व उगरगोळ यल्लम्मा डोंगर परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने तडाखा दिला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने शहरासह या भागाची दैना उडाली. सौंदत्तीहून यल्लम्मा डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचे तळे बनले आहे. तर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या यल्लम्मा डोंगरात पाणी शिरल्याने भाविकांची एकच तारांबळ उडाली. पावसाचा सौंदत्ती शहर व भागातील खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सौंदत्ती शहरातील नाले, ओढ्यांना पूर आला.
रस्त्यांनाही ओढ्याचे स्वरूप आल्याने कांहीकाळ जनजीवन स्तब्ध झाले. पाण्याच्या वेगाने व कांही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे पिके वाहून गेली. तर झाडे भुईसपाट झाल्याने परिणामी शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अतिवृष्टीने यल्लम्मा मंदिरात पाणी शिरल्याने भाविकांची ताराबंळ उडाली. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने चिपुंबी, उगरगोळ गावात मुसळधार पावसामुळे गटारीचे पाणी गावात शिरल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाचे पाणी घराघरांत शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. पाण्याबरोबर शेतीची अवजारे, प्लास्टिक व तसेच गावातील दुकाची वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. नागरिकांनी पाणी काढण्यातच रात्र घालविली. यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील नागरिकांची एकच ताराबंळ उडाली. मलप्रभा नदीच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर शेकडो वाहनांची रांग लागली होती.
घराघरांत पाणी शिरले
मुसळधार पावसामुळे गटारीचे पाणी घराघरात शिरल्याते नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी गल्लीत साठून सरळ घराघरात शिरल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.









