प्राचीन मंदीर, वायुदलाचे हेलिपॅड गेले वाहून, 10 सैनिक बेपत्ता, अनेक घरे नष्ट, बचावकार्य वेगाने
वृत्तसंस्था / उत्तरकाशी
उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी भागात अतिवृष्टीमुळे ढगफुटीची स्थिती निर्माण झाली असून मोठा हाहाकार झाला आहे. या ढगफुटीमुळे या भागातील अनेक घरे, वसतीस्थाने आणि वास्तू वाहून गेल्या आहेत. भारतीय वायुदलाचे एक हेलिपॅडही वाहून गेले असून 10 सैनिक बेपत्ता आहेत. नुकतेच उत्खननात सापडलेले एक प्राचीन मंदीरही चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. जीवीतहानी नेमकी किती झाली, यासंबंधी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, चार नागरीकांचा मृत्यू झाला असून, 50 नागरीक बेपत्ता असल्याची माहिती आहे. केंद्रीय आपत्कालीन साहाय्यता यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या यंत्रणा वेगाने बचावकार्य करीत आहेत.
या ढगफुटीमुळे पवित्र गंगोत्री धाम मंदीराचा बाह्या जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अल्पकाळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी आणि माती यांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या चिखलाचे थर या संपूर्ण भागात पसरलेले आहेत. या चिखलात अनेक घरे आणि इमारती अडकलेल्या असल्याने जीवीतहानी वाढेल अशी चिंता व्यक्त करण्यात येते आहे. उत्तरकाशीच्या हर्षिल नदीच्या भागात सर्वाधिक हानी झाली आहे. यावेळी या भागात 200 लोक होते. त्यांच्यापेकी 50 बेपत्ता आहेत.
वायुदलाचे हेलिपॅड गेले वाहून
या भागात असलेले वायुदलाचे एक हेलिपॅड पूर्णपणे वाहून गेल्याचे वृत्त आहे. या हेलिपॅडच्या परिसरात 10 सैनिक होते. ते सर्वजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. केंद्रीय आपत्कालीन साहाय्यता संस्था वेगाने कामाला लागल्या असून ढगफुटीनंतर केवळ अर्ध्या तासातच त्यांनी बचावकार्याला प्रारंभ केला होता, अशी माहिती देण्यात आली. राज्याच्या आपत्कालीन साहाय्यता संस्थाही बचावकार्य करीत आहेत. काही नागरीकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले असून ढिगाऱ्यात अडकलेल्यांना काढण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे.
नद्यांना महापूर
या भागातील खीरगंगा आणि हर्षिल या नद्यांना या ढगफुटीमुळे अचानक महापूर आला. त्यामुळे या नद्यांच्या काठांवरची गावे वाहून गेली. या गावांमध्ये त्यावेळी फारशी वस्ती नव्हती. कारण बहुतेक लोक आधीच घरे सोडून गेले आहेत. मात्र, महापुरामुळे स्थावर मालमत्तेची हानी प्रचंड प्रमाणात झाली आहे.
कल्प केदार मंदीराची हानी
ही ढगफुटी उत्तरकाशी जिल्ह्याच्या धराली या गावाजवळच्या डोंगराळ प्रदेशात झाली. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या आसपास अचानक प्रचंड पावसाला प्रारंभ झाला. दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे धराली हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले. याच गावात नुकतेच उत्खननात एक प्राचीन मंदीर सापडले होते. ते वाहून गेले. या ग्रामातील सुप्रसिद्ध कल्प केदार मंदीर ढिगाऱ्यात अडकले आहे. यास्थानी 25 ते 30 लोक वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
व्यावसायिक इमारतींची हानी
महापुरामुळे नद्यांचे वाढलेले पाणी सरळ पुढे गेले असते, तर अधिक हानी झाली असती. मात्र हे पाणी बाजाराच्या दिशेने वळले. त्यामुळे व्यावसायिक आणि व्यापारी वास्तूंची सर्वाधिक हानी झाली. त्यामुळे त्यातल्या त्यात जीवीत हानी कमी झाली आहे, अशी माहिती काही स्थानिक नागरीकांनी उपस्थित पत्रकारांना दिली. किमान तीन भागांमध्ये ढगफुटी झाली असल्याचे वृत्त आहे. उत्तरकाशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्यापही प्रचंड जलवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ढगफुटीच्या भागात वीज पुरवठा बंद पडला असून तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आपत्कालीन शिबीरांची स्थापना
हर्षिल नदीच्या उंचवट्याच्या भागात सेनेच्या सहकार्याने आपत्कालीन शिबीरे स्थापन करण्यात येत आहेत. या शिबीरांमध्ये बेघर झालेल्या लोकांच्या निवासाची सोय करण्यात येत आहे. त्यांना आहार, पाणी आणि औषधांचा पुरवठाही करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती डीएम प्रशांत आर्य यांनी दिली आहे.
गंगोत्री महामार्गाला धोका
ढगफुटीमुळे अवान बुग्याल येथून वाहणाऱ्या भेला नदीला महापूर आला आहे. त्यामुळे या नदीच्या जवळून जाणाऱ्या गंगोत्री राष्ट्रीय महामार्गाला धोका निर्माण झाला आहे. काही स्थानिकांच्या मते हा महापूर 2013 च्या महापुरापेक्षाही मोठा आहे. भागीरथी नदीचा प्रवाह अडकल्यामुळे तेथे नदीपात्रातच एक मोठे सरोवर निर्माण झाले आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने मंगळवारी रात्री दिली.
भारतीय वायुदल अग्रभागी
आपत्कालीन साहाय्यता कार्याची सूत्रे आता भारतीय वायुदलाने हाती घेतली आहेत. वायुदलाने आपली चार हेलिकॉप्टर्स साहाय्यासाठी सज्ज ठेवली आहेत. सरसाव, चंदीगढ आणि बरेली येथील वायुतळांकडून 2 चिनुक, 2 एमआय 16 व्ही 5, 2 चीता आणि 1 एएलएच हेलिकॉप्टर ढगफुटीच्या भागात पोहचले आहे.
मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी मंगळवारी संध्याकाळी आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आपत्कालीन साहाय्यता विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आपदाग्रस्तांना सर्व आवश्यक साहाय्य आणि सामग्री पुरविण्यात यावी, अशी सूचना धामी यांनी दिली आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या साहाय्यता कार्याचा आढावा घेतला आणि पुढच्या सूचना दिल्या. अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये साहाय्यता पोहचविण्यासाठी विशेष सज्जता करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांना बैठकीत देण्यात आली आहे.
2013 पेक्षाही भयंकर स्थिती
ड महापुराची स्थिती 2013 पेक्षाही भयंकर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे
ड भागीरथी नदीला महापूर आल्याने गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर संकट
ड अनेक गावांचा संपर्क तुटला, चिखलात अनेक लोक अडकल्याची भीती
ड अनेक आपत्कालीन साहाय्यता दलांकडून साहाय्यता कार्य युद्धपातळीवर









