गणेश स्थापनेलाही विलंब, नद्या ओथंबल्या, 24 तासांत 6.29 इंच पावसाची नोंद,भक्तांच्या उत्साहाचा चोळामोळा
पणजी : चतुर्थीच्या दोन दिवस अगोदरपासून पावसाने उसंत घेऊन सूर्यानेही वसुंधरेला दर्शन दिल्यामुळे चतुर्थी दणक्यात साजरी करता येईल. या अपेक्षेने उल्हासित झालेल्या गणेशभक्तांना ऐन चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासूनच पावसाने जो दणका दिला त्यातून ढगफुटीसदृश सरी कोस ल्या अन् नागरिकांच्या उत्साहाचा चोळामोळाच करून टाकला. तब्बल अडीच दिवस अखंडित कोसळलेल्या पावसाच्या धुमशानातून नद्या, नाले ओथंबून गेले. त्यातून काही ठिकाणी नद्यांना पूर आले, तर अन्यत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली. या पावसाचा हा रौद्रवतार ‘न भूतो’ असाच होता. गेल्या कित्येत वर्षात असा पाऊस अनुभवला नव्हता, अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांच्या तोंडी ऐकू येत होत्या. धुवाधार कोसळणाऱ्या या पावसाने केवळ जनतेचीच धांदल केली नाही तर गणरायालासुद्धा वेठीस धरले. स्थापना करण्यासाठी घरोघरी येणाऱ्या पुरोहित, पुजाऱ्यांना स्वघरातून बाहेर पडणेसुद्धा मुश्कील करून टाकले. त्यामुळे अनेक गावांमध्ये दिवेलागणी झाली तरी गणरायाची स्थापना करण्यात आली नव्हती. त्यातून दिवसभराच्या उपवासामुळे भुकेल्या आबालवृद्धांची चांगलीच आबाळ झाली.
सांखळीत सर्वाधिक नोंद
पाऊस मात्र धो-धो कोसळतच होता. पावसाचा हा धुमाकूळ एवढा जबरदस्त होता की, 24 तासात सरासरी 6.29 इंच एवढा विक्रमी पाऊस कोसळला. पैकी सर्वाधिक 8 इंच पाऊस सांखळीमध्ये नोंद झाला. तर अन्य प्रमुख ठिकाणांपैकी सांगे आणि फोंडा भागात प्रत्येकी 7.50 इंच, केपेमध्ये 7.25 इंच, धारबांदोडा आणि म्हापसा येथे प्रत्येकी 7 इंच, जुने गोवेत 6.50 इंच, काणकोण येथे 5.25 इंच, पणजीत 4.75 इंच तर मुरगांव व दाबोळीत 3.75 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली.
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
हवामान खात्याने बुधवारी सायंकाळी ऑरेंज अलर्ट जारी केला. गोव्यात खास करून सत्तरी आणि सांखळीत मुसळधार पावसाने जो धुमाकूळ घातला त्यामुळे सत्तरीतील काही नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सांखळी व डिचोलीतील नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा उंचीवरून वाहत होते. बुधवारची संपूर्ण रात्र बेफाम बरसलेल्या पावसाने गुऊवारी सकाळी काही प्रमाणात उसंत घेतली. तरीही दिवसभरात अधूनमधून सरी बरसतच होत्या.
3 सप्टेंबरपर्यंत शक्यता
आगामी 24 तासाच राज्यभरात सर्वत्र मध्यम तथा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि. 31 पासून हे प्रमाण अधिकच वाढत जाणार असून दि. 3 सप्टेंबरपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, पावसाचा हा कहर लक्षात घेता लोकांनी काल दीड दिवसाचे गणपती सायंकाळी 5.30 च्या दरम्यानच उत्तरपूजा करून विसर्जनासाठी घराबाहेर काढले. अनेक ठिकाणी दिवस मावळण्याच्या पूर्वीच विसर्जन करून लोकांनी एकदाचे घर गाठले. ऐन गणेशचतुर्थी काळात मुसळधार कोसळलेला हा पाऊस अनेक ठिकाणी वृक्षांच्याही मुळावर उठला. त्यातून रस्त्यावर कोसळलेल्या वृक्षांमुळे वाहतुकीतही व्यत्यय निर्माण झाला.
हे वृक्ष हटविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना भर पावसात कार्यरत व्हावे लागले. त्यांच्या या आदर्श सेवेमुळे रस्ता वाहतूक सुरळीत होण्यात मदत झाली. अनेक भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे अनेक घरांमध्ये गणरायासमोर केलेली आरास, सजावट कुचकामी ठरली. अग्निशामक जवानाप्रमाणेच येथे वीज कर्मचाऱ्यांचे कष्ट फलप्रद ठरले व वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. प्राप्त माहितीनुसार ओडिसा राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यातून मान्सून अती सक्रिय बनला होता. परिणामस्वरूप संपूर्ण गोव्यासह शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील अनेक भागांनाही या पावसाने झोडपून काढले.









