अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन असल्याने मनपा आयुक्तांना नगरसेवकाचे मागणीचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तींची प्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होत आहे. संपूर्ण देशामधून यासाठी पूजा, अर्चा केली जाणार आहे. बेळगावमध्येही शहरवासीयांतर्फे या कार्यक्रमावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तेव्हा शहरातील मांसाहारी दुकाने पूर्णपणे बंद ठेवावीत, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे साऱ्यांनाच अत्यानंद होत आहे. त्या दिवशी शहरामध्ये सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साऱ्यांचेच डोळे याकडे लागले आहेत. तेव्हा साऱ्यांनी त्या दिवशी मांसाहार टाळावा, यासाठी शहरातील चिकन, मटण यासह इतर मांसाहारी दुकाने बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.









