प्रतिनिधी,आजरा
येथील गोठण गल्लीतील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने तसेच दीड लाखांची रोकड असा तब्बल ६ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. येथील गोठण गल्लीत केशव नेवरेकर यांच्या घरी पाहिल्या मजल्यावर राहत असलेल्या विनायक कामत (वय ३३, मूळ गाव बोरवडे , ता . कागल , सध्या रा . आजरा ) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. कामत यांचा आजरा पेट्रोल पंपावर टायर पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे.
बुधवारी आठवडा सुट्टी असल्याने ते पाहुण्यांकडे मठगाव येथे गेले होते.गुरुवारी सकाळी १० वाजता ते आजरा येथे आल्यानंतर घरचा दरवाजा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चोरट्यांनी तिजोरी चावीने खोलून तिजोरीतील दागिणे व रोकड लंपास केली आहे. घटनास्थळी गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले , आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.









