ओटवणे प्रतिनिधी
Closed freezer in Sawantwadi mortuary immediately operational!
युवा रक्तदाता संघटनेच्या दणक्यानंतर दखल
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात नव्यानं बसविण्यात आलेल्या बंद फ्रिजरबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्याचा इशारा देताच प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली. संबंधित फ्रिजर कंपनीचा टेक्निशियन गुरुवारी संध्याकाळी मुंबईतून सावंतवाडीत दाखल होत हा बंद फ्रिजर तात्काळ कार्यान्वित केला.
शवागृहातील हा नवा फ्रिजर कुलिंग देत नसल्यामुळे रात्री-अपरात्री मृतदेह ठेवायचा कुठे? हा प्रश्न निर्माण होऊन नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कुलिंग न देणाऱ्या या नव्या फ्रीजरच्या खरेदीची सखोल चौकशी करावी तसेच हा फ्रिजर तात्काळ कार्यान्वित करावा अन्यथा याचा जाब विचारण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिला होता.
त्यामुळे खडबडून जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवली. त्यानंतर या फ्रिजरच्या कुडाळ येथील डिस्ट्रीब्यूटर मार्फत संबंधित कंपनीचा टेक्निशियन संध्याकाळी सावंतवाडी आला. यावेळी त्याने हा फ्रिजर कार्यान्वित करून हा फ्रिजर कसा हाताळावा याचे दोन वेळा प्रशिक्षणही संबंधित कर्मचाऱ्याला दिले.
दरम्यान या फ्रिजरच्या देखभालीकडे आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच त्यामध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे या फ्रिजरच्या देखभालीसाठी स्वतंत्र ऑपरेटर नेमणुकीची गरज आहे. रुग्णालय प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन या शवागृहात ऑपरेटर नेमावा अशी देव्या सूर्याजी यांनी मागणी केली असून याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. दरम्यान रुग्णालय प्रशासनाला इशारा देताच या बंद फ्रिजरची तात्काळ दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.