राष्ट्रीय गोरक्षा दलाचा सरकारला इशारा
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या गुरांची कत्तल केली जात आहे. प्रत्येक मनुष्याबरोबर प्राण्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही कत्तल थांबणे अनिवार्य आहे. यासाठी राष्ट्रीय गोरक्षा दल नेहमी आवाज उठवत आले आहे. तरीही सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. अनेक वर्षांपासून गुरांच्या कत्तलखान्यांविरोधात आमचा लढा सुरू आहे. थरीही ही बेकायदेशीर कत्तल थांबलेली नाही. पण, आता या गोष्टी सहन केल्या जाणार नसून, सरकारने त्वरित राज्यातील कत्तलखाने बंद करावेत, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय गोरक्षा दलाचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी काल (गुऊवारी) पणजीत दिला.
पणजीतील आझाद मैदानावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राज्यातील गोरक्षा दलाचे प्रमुख हनुमंत परब,ऋषी वशिष्ठ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रधान यांनी सांगितले की, देशातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर गुरांची कत्तल करण्याचे प्रकार सुरू आहेत. याविरोधात राष्ट्रीय गोरक्षा दलातर्फे वारंवार उठवला जात आहे. घोव्यातही हनुमंत परब हे प्रामाणिकपणे गुरांची कत्तल थांबावी, यासाठी लढत आहेत. परंतु त्यांच्यावर अनेकवेळा हल्ले झाले आहेत. याला जबाबदार एकप्रकारे सरकारच आहे. आता यापुढे हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. बेकायदेशीरपणे होणारी गुरांची कत्तल थांबली नाही, तर आम्हाला नाईलाजाने जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असही ते म्हणाले.
सक्रीय लढा यशस्वी करू….
राज्यात बेसुमार आणि बेकायदेशीरपणे गुरांची कत्तल केली जात आहे. वारंवार आवाज उठवूनही हा प्रकार बंद झालेला नाही. आवाज उठवल्यानंतर काही दिवस त्यावर परिणाम होतो. परंतु पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ असाच प्रकार सुरू आहे. या प्रकाराला सरकारचे अभय मिळत असल्याचा आमचा संशय आहे. घेली अनेक वर्षे कत्तलखान्यांविरोधात लढा देऊनही सरकारकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. पण, आता यापुढे असे प्रकार आम्ही चालवू देणार नसून, सक्रीय लढा यशस्वी करून दाखवू, असा विश्वास हनुमंत परब यांनी व्यक्त केला.









