पेडणे गटकाँग्रेसचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पेडणे : सरकारने ज्या पद्धतीने लोकांना धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. त्याच पद्धतीने पेडणे तालुक्यातील उघड्या चीरेखाणी आहेत त्या बंद कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांना पेडणे गटकाँग्रेसने मंगळवारी सादर केले. निवेदन देताना पेडणे गटकाँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा नाईक, सरचिटणीस तथा प्रवत्ते अॅड. जितेंद्र गावकर, मांद्रे गटकाँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर, प्रणव परब आदी उपस्थित होते. राज्यातील धबधब्यांवर अघटीत घटना घडत असल्यामुळे तेथे जाण्यास सरकारने नुकतीच बंदी घातली. परंतु गावात जे छोटे धबधबे आहेत त्या ठिकाणी जाण्यास स्थानिकांना मुभा देण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली. चिरेखाणी बंद करण्यासाठी पेडणे गटकाँग्रेसतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. त्या निवेदनाद्वारे तालुक्यातील उघड्या चिरेखाणी बंद होतील. मात्र गावातील धबधब्यावर स्थानिक आंघोळीचा आनंद लुटत असतील तर काही हरकत नाही. परंतु पर्यटकांनी आणि नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे पेडणे गट काँग्रेस अध्यक्ष कृष्णा नाईक म्हणाले.
सरकारने धबधब्यांवर जाण्यास बंदी चा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला आम्ही मान्यता देत नाही. सरकार आपल्याला हवा तसा कायदा करत असून तो नागरिकांवर लादला जातो. याबाबत सरकारने फेरविचार करावा, गावागावात जे छोटे धबधबे आहेत, त्या ठिकाणी मनोरंजनाबरोबरच आंघोळ करून मनमुरात आनंद लुटण्यासाठी स्थानिकांना बाधा आणू नये. सरकारला लोकांच्या जीवाची काळजी असेल तर पेडणेतील उघड्या चिरेखाणी त्वरित बंद कराव्यात, अशी मागणी मांद्रे गटकाँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर यांनी केली. सहा वर्षांपूर्वी तुये चिरेखाणीत चार विद्यार्थी बुडून मरण पावले. त्यावेळी हरित लवादाने दखल घेऊन सरकारला आदेश दिला होता. चिरेखाणी बंद करा, त्या बुजवा, त्यांना सील करा परंतु आजपर्यंत कार्यवाही झाली नाही. सरकारने आपल्याला हवा तसा कायदा तयार करून पावसाळी पर्यटनावर बंदी घातली आहे. सरकारने गावागावात जे छोटे धबधबे छोटे आहेत त्या ठिकाणी मात्र मुभा द्यावी. अशी मागणी काँग्रेस प्रवत्ते अॅड. जितेंद्र गावकर यांनी केली. प्रणव परब यांनी सांगितले की कुळे धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जे पर्यटक येत होते. त्यांना पोलिसांनी मारले, बडवले, शिक्षा दिली. हे योग्य नसून या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सरकारला जर खरोखरच जनतेच्या जीवाची काळजी वाटत असेल तर त्यांनी अगोदर पेडणेतील धोकादायक चिरेखाणी उघड्या आहेत त्यावर कारवाई करावी.









