प्रतिनिधी/ सातारा
वनविभागाने नुकतीच कासच्या जंगलात रात्र फिरतीला परवानगी दिली आहे. ती परवानगी तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा आम्हाला सनदशीर मार्गाने आपल्या विरुद्ध पाऊल उचलावे लागेल असा इशारा पर्यावरण प्रेमींनी निवेदनाद्वारे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना दिला आहे.
निवेदन देताना सुनिल भोईटे, पंकज नागोरी, प्रकाश टोपे, राजेंद्र चोरगे, डॉ. संदीप श्रोत्री आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वनविभागामार्फत व संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास च्या माध्यमातून कास व परिसरामध्ये नाईट सफरीच्या नावाखाली चारचाकी वाहनांमधून पर्यटकांना रात्री-अपरात्री जंगलामध्ये फिरवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमास आमची हरकत आहे. आमच्या हरकती आपणाकडे नोंदवित आहोत. या सर्व हरकतींची पूर्तता करावी त्यानंतरच ही व अशा प्रकारच्या नाईट सफरी जिह्यामध्ये सुरू कराव्यात. तो पर्यंत ही नाईट सफरी ताबडतोब बंद करण्यात यावी. या नाईट सफरीस महाराष्ट्र अथवा भारत सरकारची कोणत्याही प्रकारची मान्यता, परवानगी नाही. या धर्तीवर नाईट सफरी करण्याकरिता वनखात्याकडे देखील स्वतंत्रपणे कोणत्याही प्रकारचे आदेश अध्यादेश किंवा त्याची वैधानिक मार्गदर्शक तत्वे नाहीत. नाईट सफरीस राज्य वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, नॅशनल टायगर कन्जर्वेशन अथॉरिटी वाईल्डलाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, बोटॅनिकल सर्व्व्हे ऑफ इंडिया, राज्य व राष्ट्रीय जैवविविधता मंडळ यांच्या मान्यता नाहीत. विभागाने जाहीर केल्यानुसार नाईट सफारीच्या मार्गातील काही भूप्रदेश हा सह्याद्री व्याघ्र राखीवच्या बफर क्षेत्रात येत आहे. त्याकरिता वन्यजीव विभाग, नॅशनल टायगर कन्जर्वेशन अथॉरिटी, स्थानिक सल्लागार समिती (सह्याद्री व्याघ्र राखीव), पर्यटन समिती (सह्याद्री व्याघ्र राखीव) यासह उच्चस्तरीय सनियंत्रण समिती महाबळेश्वर यांची परवानगी घेण्यात आलेली नाही. सातारा जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, जिल्हा कृषी अधिकारी, पशु संवर्धन विभाग प्रमुख आणि संबंधित गावच्या ग्रामसभा यांच्या संमती घेण्यात आलेली नाही. जिल्हा जैवविविधता समिती, जिल्हा पर्यावरण समिती, जिल्हा पर्यटन समिती या सातारा जिह्यातील अनुषंगिक समित्यांची मान्यता नाही.
सातारा शहर व परिसरातील निसर्गप्रेमी संस्था यांचे प्रतिनिधी, माहितगार, गाववाल्यांशी याबाबत चर्चा विचारविनिमय करणे आवश्यक आहे. तसे न करता परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.








