मुख्यमंत्र्यांचा नगरविकास विभागाला आदेश
कोल्हापूर
स्थानिक संस्था कर विभागा संदर्भात अखेरची बैठक बोलावून स्थानिक संस्था विभाग कायमचा बंद होणेबाबत कार्यवाही करण्याचे आदेश बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागास दिला असल्याचे पत्रक कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडास्ट्रिजने प्रसिध्दीस दिले आहे.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने स्थानिक संस्था कर विभाग बंद होणेबाबत अनेकवेळा पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडची राज्यस्तरीय व्यापारी परिषद कोल्हापूरात झाली होती. या बैठकीस कॅमिटचे प्रेसिडेंट दिपेन आगरवाल व चेअरमन मोहन गुरनानी उपस्थित होते. या परिषदेत चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्थानिक संस्था कर विभाग बंद होणेसाठी पाठपुरावा करण्याची विनंती दिपेन आगरवाल यांना केली होती. त्यावेळी आगरवाल यांनी स्थानिक संस्था कर विभाग बंद करणेबाबत लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बैठक बोलावून यातून मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्याचवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी स्थानिक संस्था कर विभाग कायमचा बंद करणारच असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्यानुसार त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक संस्था कर विभागाची माहिती दिली.
स्थानिक संस्था कर विभाग कायमचा बंद करण्याची विनंती फडणवीस यांना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत अखेरची बैठक घेऊन स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याचे आदेश नगरविकास विभागास दिले. पुढील आठवड्यात नगरविकास विभागासोबत बैठक घेऊन यातून मार्ग निघेल असा विश्वास दिपेन आगरवाल यांनी यावेळी व्यक्त केला.








