कर्नाटक भीम सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा तसेच क्वॉरी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक स्थळांना धोका निर्माण झाला आहे. झाडे तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे. तेव्हा तातडीने याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक भीमसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हलशी गावामध्ये ऐतिहासिक स्थळे आहेत. त्याचे जतन करणे हे साऱ्यांचेच कर्तव्य आहे. याचबरोबर त्या ठिकाणी रामतीर्थ देवस्थानही आहे. त्याचेही रक्षणे करणे गरजेचे आहे. मात्र या देवस्थानजवळच क्वॉरी सुरू करण्यात आली असून ती तातडीने बंद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यामध्ये घनदाट जंगल आहे. मात्र त्यामधील झाडे तोडून अक्षरश: अनेकांनी लूट केली आहे. तेव्हा झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा, असा नारा दिला जातो. मात्र प्रत्यक्षात झाडे लावली जात नाहीत. तेव्हा बेळगावसह खानापूर तालुक्यात जिल्हा प्रशासनाने झाडे लावण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण मादार, लक्ष्मण के. आर. यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









