रायगड प्रतिनिधी
रायगड पोलीस दलामध्ये भरती झालेल्या पंधरा प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांकडून कोरोना लसी करण आणि वैद्यकीय चाचणी प्रमाणपत्र देण्यासाठी रायगड जिल्हा रुग्णालयातील लिपीकाने पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रायगड जिल्हा रुग्णालयातील वार्ड बॉय ने दिलेल्या फिर्यादीवरून, जिल्हा पोलीस दलातील १५ प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांकडून कोरोना लसीकरण व वैद्यकीय चाचणी प्रमाणपत्र देण्यासाठी रुग्णालयातील लिपिक प्रदीप ढोबळ याने प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांकडून लाच मागितली, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रदीप ढोबळ याची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली,
पोलीस दलामध्ये उमेदवारांची भरती करताना ती पारदर्शक व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने सुरुवातीपासून खबरदारी घेतली होती, भरती करता कोणीही रक्कम देऊ नये तसेच फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते, तरीही पात्र उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याने घोळ घातला अशी माहिती पोलीस मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल शेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव उपस्थित होते. पोलिसांनी वार्ड बॉयची सखोल चौकशी केल्यानंतर १४ महिला उमेदवारांकडून प्रत्येकी दीड हजार व एका उमेदवाराकडून ५०० रुपये असे एकूण २१ हजार ५०० रुपये घेतल्याची उघड झाले, पोलिसांनी याप्रकरणी भादवि ३५४ प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय जाधव हे पुढील तपास करत आहेत.