वार्ताहर /दाभाळ
बेतोडा निरंकाल येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला गव्या रेड्यांचा वावर वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वनखात्यातर्फे रस्त्याच्या बाजूची झुडूपे कापून जागा मोकळी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. फोंडा ते दाभाळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बेतोडा पासून निरंकाल दरम्यान राखीव वनक्षेत्र लागते. पावसाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दाट झाडी वाढल्याने गव्या रेड्यांचा वावर वाढला होता. 25 ते 30 गव्यारेड्यांचा तांडा या भागातून भटकाताना वाहनचालकांच्या दृष्टीस पडत असल्याने भितीचे वातावरण आहे. बऱ्याचवेळा हे गवेरेडे अचानक झुंडीने रस्ता ओलांडताना वाहनांसमोर येऊन धडकतात. त्यामुळे अपघातांचा वाढता धोका आहे. दोन्ही बाजूंने झाडी वाढल्याने अचानक समोर येणारे हे वन्य प्राणी वाहनचालकांच्या नजरेस पडत नव्हते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झुडुपे तसेच वन्य परिसरात साफसफाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात होती. वनखात्याने झुडुपांची काटछाट करून दोन्ही बाजूच्या वन्य परिसरात साफसफाई केल्याने हा धोका कमी झालेला आहे. वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी ज्या जागांवरून गवे रेडे रस्ता ओलांडतात त्या त्या ठिकाणी सूचना फलक उभारण्याची मागणीही केली जात आहे.









