पणजी / प्रतिनिधी
केंद्रीय व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (CMAT) 4 मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. भारतातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे CMAT आयोजित केले जाते. देशातील सर्वोत्कृष्ट एमबीए संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्षभर या परीक्षेची तयारी करतात. परंतु या परीक्षेच्या दिवशी गोवा विद्यापीठाने कॅम्पस आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये परीक्षेसाठी अंतिम वर्षाचे पेपर्स शेड्यूल केले होते. दोन्ही परीक्षा तितक्याच महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आता घबराट निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची चिंता गांभीर्याने घेत, अभाविप गोवाने विद्यार्थी हिताचा मुद्दा घेऊन गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांची भेट घेतली. यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी अभाविपने विद्यापीठाकडे केली. उद्यापर्यंत हा प्रश्न सोडवला जाईल आणि सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे आश्वासन कुलसचिवांनी दिले.
अभाविपच्या गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर म्हणाल्या, ठही प्रवेश परीक्षा एमबीएच्या इच्छूकांसाठी महत्त्वाची परीक्षा आहे आणि अशा परिस्थितीत ते घाबरले आहेत. हे सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभाविपशी संपर्क साधल्यानंतर, आम्ही या प्रकरणात विद्यापीठाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.









