ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जून 2020 पासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडला होता. काँग्रेस कार्यकर्ते रतन सोली यांनी राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे, असं म्हणत राज्यपालांना आम्ही निर्देश देऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी 8 महिने कोणतीही कारवाई केली नाही.
दरम्यानच्या काळात राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी नवीन यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवली. मात्र, या दरम्यान याचिकाकर्ते रतन सोली यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना सुनील मोदी यांनी इन्टेव्हेशन दाखल केली. न्यायालयात 2 तारखानंतर मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांनी याचिका मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला. रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे. तसेच यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयाने दाद मागायची असल्यास नवी याचिका करायला सांगितलं आहे.