तुर्कियेने मागे घेतला आक्षेप : युरोपीय महासंघात सामील करण्याची मागणी
वृत्तसंस्था / विल्नियस
तुर्कियेने स्वीडनला नाटोत प्रवेश देण्यास हिरवा झेंडा दाखविला असल्याची घोषणा नाटोचे महासचिव जेन स्टोल्टनबर्ग यांनी केली आहे. तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान यांनी स्वीडनच्या नाटोतील प्रवेशाचा प्रस्ताव स्वत:च्या देशातील संसदेत सादर करण्याची तयारी दर्शविली आहे. हा प्रस्ताव लवकर संमत होईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले आहे, परंतु याकरता त्यांनी तारखेची घोषणा केलेली नाही.
लिथुआनियाच्या विल्नियस शहरात नाटोची परिषद आयोजित होत आहे. या परिषदेच्या पूर्वी स्टोल्टनबर्ग यांनी स्वीडन आणि तुर्कियेच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली आहे. यानंतर एका संयुक्त वक्तव्यात स्वीडनचे पंतप्रधान क्रिस्टर्सन यांनी हा दिवस स्वीडनसाठी एक चांगला दिवस असल्याचे नमूद पेले आहे.
नाटो सदस्यत्वाच्या बदल्यात स्वीडन तुर्कियेच्या युरोपीय महासंघातील प्रवेशाच्या प्रयत्नांना समर्थन देणार आहे. तुर्कियेच्या संसदेकडून स्वीडनच्या नाटो सदस्यत्वाला मान्यता मिळण्यापूर्वी आमच्या देशाला युरोपीय महासंघात सामील करण्यात यावे असे एर्दोगान यांनी म्हटले होते. स्वीडनमध्ये धर्मग्रंथ जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर तुर्कियेकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर तुर्कियेने स्वीडनच्या नाटोतील सहभागाला दिलेली मंजुरी आश्चर्यकारक मानली जात आहे.
हंगेरीकडूनही सहमती
यापूर्वी 6 जुलै रोजी हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांच्या चीफ ऑफ स्टाफने स्वीडनच्या नाटोतील प्रवेशावर कुठलाच आक्षेप नसल्याची घोषणा केली होती. आता तुर्कियेच्या निर्णयाचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी स्वागत केले आहे. अमेरिकेसह नाटोचे अन्य सदस्य देश अनेक महिन्यांपासून स्वीडनच्या सदस्यत्वाला मंजुरी मिळावी म्हणून तुर्कियेची मनधरणी करत आहेत.
तुर्कियेचे दबावतंत्र
स्वीडनच्या सदस्यत्वाद्वारे तुर्किये अमेरिकेवर लढाऊ विमाने पुरविण्यासाठी दबाव आणत होता असे मानले जातेय. ऑक्टोबर 2021 मध्ये तुर्कियने 20 अब्ज डॉलर्सच्या रकमेद्वारे एफ-16 लढाऊ विमानांसमवेत अन्य लढाऊ विमानांसाठी 80 मॉडर्नायझेशन किट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एफ-16 व्यवहार स्वीडनच्या सदस्यत्व कराराचा हिस्सा होता अशी पुष्टी नाटो प्रमुख स्टोल्टनबर्ग यांनीही दिली आहे.
झेलेंस्कींना भेटणार बिडेन
नाटो परिषदेदरम्यान बिडेन हे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांना भेटणार आहेत. या बैठकीचा उद्देश रशिया-युक्रेन युद्धावरून जगासमोर नाटोच्या सर्व सदस्य देशांची एकता दाखवून देणे आहे. नाटो परिषदेत युक्रेन युद्ध आणि भविष्यातील युक्रेनच्या सदस्यत्वावरून चर्चा होण्याची अपेक्षा आहे. केवळ करमणुकीसाठी या परिषदेत सहभागी होऊ इच्छित नाही. रशियाविरोधात एकजुटता दाखवून देण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. युक्रेन जोपर्यंत नाटोत सामील होत नाही तोवर संघटनेकडून आमच्या देशाला योग्य सुरक्षा हमी मिळावी अशी मागणी झेलेंस्की यांनी केली आहे.









