27 रोजी निवडणूक : विकासकामांना मिळणार चालना
बेळगाव : चार महिने लांबणीवर पडलेल्या स्थायी समित्यांची निवडणूक अखेर निश्चित झाली आहे. स्थायी समित्यांच्या 21 व्या कार्यकाळासाठी येत्या 27 जूनला निवडणूक होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका नगरसेवकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर कारणांमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. आता निवडणुकीसाठी तारीख निश्चित झाल्याने मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीकडे आता नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. मनपा निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर निवड बराचकाळ रेंगाळली होती. त्यानंतर महापौर व उपमहापौर निवड झाली. मात्र आता स्थायी समितीच्या निवडणुकीचा प्रश्न उभा आहे. स्थायी समितीची निवडणूक दि. 27 जून रोजी होणार असल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर प्रभागातील विकासकामांना जोर येणार आहे. या निवडणुकीसाठी 27 रोजी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर प्रभाग समित्यांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांकडून विकासकामांसाठी समित्यांच्या स्थापनेची मागणी जोर धरून आहे.









