उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश: अटींचे उल्लंघन केले : पाच हजार आंदोलकांना परवानगी
प्रतिनिधी/ मुंबई
न्यायालयाच्या आदेशानंतर मुबंईकडे कूच केलेल्या मराठा आंदोलकंनी दिलेल्या परवानगीच्या अटींचे प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनकर्ते आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि गौतम अंखड यांच्या विशेष खंडपीठाने मुंबईतील परिस्थिती सुधारण्याची आणि मंगळवारी दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ पाच हजार कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज करावा असे स्पष्ट करून याचिकेची सुनावणी मंगळवारी नियमित खंडपीठासमोर निश्चित केली.
मराठा आरक्षण चिघळण्याच्या मार्गांवर आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण विषय आंदोलनाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याने आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी दिलेल्या परवानगीला आव्हान देणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेसह इतरांच्या याचिकांवर सोमवारी दुपारी अडीच वाजता न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि गौतम अंखड यांच्या विशेष खंडपीठासमोर तातडीने सुनावणी घेण्यात आली. मनोज जरांगे-पाटील यांच्या वतीने वकिलांनी, राज्य सरकारच्या वतीने राज्याचे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. केवळ पाच हजार कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील. तसेच मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले.
हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना
- आझाद मैदानातील सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करण्याचे आदेश.
- आंदोलनाला परवानगी नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकार मोकळे. मुंबईत आणखी आंदोलनकर्ते प्रवेश करणार नाहीत याची राज्य सरकारने काळजी घ्यावी. आणखी आंदोलनकर्त्यांनी मुंबईत येण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारने योग्य ते पावले उचलून त्याचे मुंबईत येणे थांबवावे.
- मुंबईतील मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह परिसर आणि दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा.
- शाळा आणि कॉलेज बाधित होतील. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाही, दुधाच्या,भाजीच्या गाड्या मुंबईत आल्या नाहीत तर काय होईल? अशी सरकारला विचारणा.
- मुंबई उच्च न्यायालयात देखील आंदोलनकर्त्यांचा आवाज ऐकू येऊ लागल्याने उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
हायकोर्टाच्या आंदोलकांच्या वकिलांना सूचना
- 5000 आंदोलकांनाच केवळ परवानगी. 26 ऑगस्टचा उच्च न्यायालयाच्या इतर आदेशाचे तुम्ही पालन करणार का?
- आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या 5000 पेक्षा जास्त लोकांनी परत जावं, अशा आशयाचं प्रसिद्धी पत्रक तुम्ही काढणार का?
- शहर थांबवलं जाऊ शकत नाही, गणेशोत्सव देखील आहे. रस्ते आंदोलनकर्त्यांनी खाली करावेत, स्वच्छ करावेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा मंगळवारी दुपारपर्यंत खाली करावी.
- आम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यात आले, ज्याने स्पष्ट होतंय की मुंबईचे रस्ते अडवण्यात आले आहेत.
- आंदोलन हाताबाहेर गेलं आहे. तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही, रस्ते अडवू शकत नाही. मुंबईची दिनचर्या थांबवू शकत नाही.s
सरकारची भूमिका
आंदोलनकर्त्यांनी अटींचे उल्लंघन केले आहे. 2025 च्या नियमांनुसार एका दिवसासाठी आयोजकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आझाद मैदानावर फक्त 5000 निदर्शकांना परवानगी देण्यात आली होती. उपोषणाची परवानगी देण्यात आलेली नाही. 29 ऑगस्टनंतर आंदोलनाला परवानगी वाढविण्यात आलेली नाही. लाखो आंदोलनकार्यकर्ते मुंबईत धडकल्याने शाळा आणि महाविद्यालयांना अडथळा निर्माण झाला. वाहतूक ठप्प झाले. आंदोलकांनी परवानगीच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन केले आहे. पोलिसांमार्फत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मोठ्या संख्येने आंदोलक मुबंईत आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने अडव्होकेट जनरल डॉ. वीरेंद्र सराफ यांनी न्यायालायला दिली. यावेळी न्यायालयासमोर बातम्या आणि छायाचित्रे सादर करण्यात आली. त्यांची न्यायालयाने दखल घेतली आहे.

कोर्टाच्या निर्णयाचे आपल्याला पालन करायाचे आहे : जरांगे पाटील
हायकोर्टात सुनावणी झाल्यावर कोर्टाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ‘कोर्टाच्या निर्णयाचे आपल्याला पालन करायचे आहे. सर्व आंदोलकांनी शांत बसावे. आरक्षण घेतल्याशिवाय मी उठणार नाही. सरकारच्या बैठकांबाबत मी फक्त माध्यमांमधून ऐकत आहे.’
‘आंदोलकांनी आपली वाहने मुंबईतील पार्किंगमध्ये लावावीत, मी मेलो तरी चालेल, पण मी आरक्षण घेणारच. आम्ही भुजबळ यांना जास्त महत्व देत नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे फायनल आहे. मी तुमच्या लेकरांसाठी लढा देतोय. ज्यांना माझ ऐकायच नाही त्यांनी गावी निघून जावे. सरकारच्या लोकांनी इथे चर्चेला यावे. तुमच्याशी बोलण्यासाठी मला पाणी प्यावे लागले. मुंबईकरांना त्रास होईल असे कोणी वागू नका. हेच आंदोलक अंतरवालीत देखील होते, पण या ठिकाणी षडयंत्र दिसून येत आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.









