चिपळूण :
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याचे बील अधिक येत असल्याने ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम उडाला आहे. त्यामुळे जुने आणि नवे असे दोन मीटर बसवून वीजबिलामध्ये नेमका काय फरक पडतो, याबाबत डेमो घ्या, ग्राहकांचा संभ्रम दूर करा आणि मगच घराघरात स्मार्ट मीटर बसवा, अशा स्पष्ट सूचना आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावर जिल्ह्यात चारही विभागीय कार्यालयस्तरावर प्रत्येकी दोन डेमो घेण्याचे मुख्य अभियंत्यांकडून जाहीर करण्यात आले.
घर मालकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांना विश्वासात न घेता महावितरणकडून नवीन खासगी मीटर बसवले जात आहेत. या मीटरच्या माध्यमातून वीजबिलांच्या रकमेत मोठी वाढ झाली असून ठिकठिकाणी वीज मीटर बसवण्यास विरोध होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी शुक्रवारी सायंकाळी सावर्डे येथे महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता नितीन पळसुले देसाई, संतोषकुमार कॅरमकोंडा, उपकार्यकारी अभियंता अनिल खोडे, शाखा अभियंता प्रवीण राऊत, मानव संशोधन विभागाचे व्यवस्थापक अशोक काजरोळकर यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
या बैठकीत उपस्थितानी स्मार्ट मीटरसह वीजपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. सध्या घर मालकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांना विश्वासात न घेता खासगी कंपनीचे कर्मचारी घराघरात जाऊन स्मार्ट मीटर बसवत आहेत. या मीटरच्या माध्यमातून वीजबिलांच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या संमत्तीशिवाय नवीन मीटर बसवू नयेत, मीटर वाचन नियमितपणे करुन त्याची माहिती ग्राहकांना द्यावी, दिलेली वीजबिले पुन्हा तपासून ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क करुन सुधारित करावीत, खासगी कंपन्यांची नियुक्ती थांबवावी व सर्व कामे महावितरणमार्फत पारदर्शक पद्धतीने करण्यात यावीत आणि वीजमीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केली.
आमदार निकम यांनीही ग्राहकांचे म्हणणे योग्य असून त्यांच्या मनातील स्मार्ट मीटरबाबतचा संभ्रम दूर होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करुन मगच स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. यावर मुख्य अभियंता डोये यांनी सांगितले की, जिल्ह्यात महावितरणची चार विभागीय कार्यालये असून प्रत्येक ठिकाणी जुने आणि नवीन वीजमीटर बसवून येणारे बील तपासणीसाठी प्रत्येकी दोन डेमो घेण्यात येतील. नवीन स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलाबाबत आक्षेप घेतल्यास तेथेही दोन्ही मीटर बसवून तपासणी केली जाईल. स्मार्ट मीटर बसवण्याचे धोरण हे सरकारचे असून त्यामध्ये कुठलीही गडबड नाही. मात्र जो काही ग्राहकांचा संभ्रम वाढला आहे, त्याबाबत महावितरणकडून आवश्यक ती जनजागृती केली जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी आमदार निकम यांनी आपल्या मतदार संघातील चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील वीजपुरवठ्याचे प्रलंबित प्रश्न, प्रथदीप बसवताना ब्रॅकेटसाठी येणारा खर्च, गंजलेले वीजखांब, कर्मचाऱ्यांची कमतरता यासह चिपळूण शहर आणि खेर्डीसह महत्वाच्या गावांमधील अंडरग्राऊंड केबल्स टाकण्याबाबतचे मुद्दे मांडले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, मिलिंद कापडी, हनिफ हरचिलकर, बाबू साळवी, बाळू ढवळे, पांडुरंग माळी, प्रभाकर सैतवडेकर, दशरथ दाभोळकर, पंकज पुसाळकर, सुशील भायजे, शौकत माखजनकर, सूर्यकांत चव्हाण, नितीन भोसले, गणपत चव्हाण, संजय चव्हाण, जमीर मुल्ला, शेखर उकार्डे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.








