दिवसभरात बाजारपेठेत गर्दी : संततधारेमुळे विक्रेत्यांची तारांबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्याचे दिसून आले. परिणामी शनिवारी दिवसभर ऊन्ह तर सायंकाळी 6 नंतर पावसाने हजेरी लावली. यामुळे विक्रेते व नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर ऊन्ह असल्याने छत्री व रेनकोट न घेता बाहेर पडलेल्या नागरिकांना सायंकाळी भिजत जावे लागले. पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. यामुळे चार दिवसांपासून काही प्रमाणात ठप्प झालेली बाजारपेठ पुन्हा फुलल्याचे दिसून आले. त्याचबरोबर शनिवार-रविवार सुटी असल्याने नागरिक पर्यटनस्थळांना गेल्याचेही पहावयास मिळाले. आर्द्रा नक्षत्राने जोरदार सलामी दिल्याने शहरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधार पावसामुळे शेतजमिनीसह शहर परिसरात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्यास अनुकूल करून दिले होते.
गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. पावसामुळे नाले-गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. आता पावसाने उसंत घेतल्याने महापालिकेने नाले-गटारींची स्वच्छता करून घेणे योग्य ठरणार आहे.









