पावसामुळे व्यावसायिक-नागरिकांची उडाली तारांबळ : मोठ्या पावसाची प्रतीक्षा
बेळगाव : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर काही दिवस पावसाची रिपरीप झाली. मात्र जोरदार पाऊस झालाच नाही. बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. सायंकाळी अचानक ढग जमा होऊन पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला तरी मोठ्या पावसाची साऱ्यांना प्रतीक्षा आहे. पाऊस पडला तरच पाणी समस्या दूर होणार आहे. त्याचबरोबर पिकांनाही जीवदान मिळणार आहे. अन्यथा पाणी समस्या गंभीर बनणार आहे. त्याचबरोबर पिकेही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभर उन पडले होते. हवेमध्ये उष्माही जाणवत होता. त्यामुळे मान्सूनने पाठ फिरविल्याचे बुधवारी दिसून आले. दिवसभर उन असल्यामुळे पाऊस येणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत असताना सायंकाळी मात्र पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी 7 च्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. दिवसभर उन असल्यामुळे व्यावसायिकांनी कोणतीच तयारी केली नव्हती. मात्र सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांनाही आडोसा घ्यावा लागला. या पावसामुळे बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते.
गणपत गल्लीत गटारीतील पाणी रस्त्यावर…
सायंकाळी झालेल्या दमदार सरींमुळे गटारींतून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. गणपत गल्ली येथे तर गटार भरून रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या दमदार पावसामुळे बैठ्या व्यापाऱ्यांची पंचाईत झाली होती.









