अध्यक्ष दाजी साळकर यांची माहिती, गटारे साफ करण्याची जबाबदारी पालिकेची
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या एसजीपीडीएच्या किरकोळ मासळी मार्केटाच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल. या स्वच्छतेचा एक भाग म्हणून मार्केट परिसरातील गटारातील गाळ उपसून गटारे साफ करण्यात आल्याची माहिती एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसजीपीडीए व मडगाव नगरपालिका यांनी संयुक्तरित्या काम केल्यास या मार्केटाचा दर्जा आणखीन उंचावणे शक्य असल्याची माहिती यावेळी श्री. साळकर यांनी दिली. गेली अनेक वर्षे मार्केट परिसरातील गटारे साफ करण्यात आली नव्हती. त्यामुळे गटारे तुडूंब भरून सांडपाणी उघड्यावर वहात होते. मात्र, ही गटारे साफ करण्याचे काम एसजीपीडीएने हाती घेतले असून सांडपाण्याचा प्रश्न सुटल्यात जमा असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यतरी या मार्केटचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी हे मार्केट दुबईच्या धर्तीवर मार्केट बनल्याचे विधान करण्यात आले होते. मात्र, मार्केटच्या नूतनीकरणावेळी गटारातील गाळ उपसला गेला नव्हता. जर गाळ उपसला असा तर या ठिकाणी दुर्गेधी झाली नसती असे श्री. साळकर म्हणाले. आपण कुणावर आरोप करत नाही. पण, सत्य परिस्थिती नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
इमारत एसजीपीडीएची नव्हे…
एसजीपीडीएचे कार्यालय या इमारतीत आहे. त्यामुळे अनेक लोकांचा समज आहे की ही इमारत एसजीपीडीएची. परंतु, ही इमारत एसजीपीडीएची नव्हे. या इमारतीत सुमारे 50 कार्यालये आहे. त्या सर्वांची ही इमारत असून या इमारतीची देखभाल करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. आज ‘लिफ्ट’ची परिस्थिती वाईट आहे. ती दुरूस्त करण्याची गरज असून त्याला इमारतीत असलेल्या कार्यालयांनी त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री. साळकर यांनी केले.
मार्केटच्या परिसरात असलेली डस्टबिन देखील खराब झाली होती. या डस्टबिनला तळातून गळती लागली होती. आपण स्वता पदर मोड करून दहा डस्टबिन नव्याने पुरविल्याची माहिती त्यांनी दिली.
मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या सोबत संयुक्त बैठक घेऊन समस्यांवर तोडगा काढला जाईल अशी माहिती देण्यात आली. वीज बिल तसेच कोट्यावधी रूपयांच्या घरात पाण्याची बिले देय होती. त्यात 6 लाख रूपयांची वीज बिले चुकती केली आहे. तर पाण्याची 40 लाख रूपयांची बिले चुकती केली आहे. सद्या एसजीपीडीए बिलाची देणे बाकी नसल्याची माहिती त्यांनी दिली.
फेस्ताच्या फेरीतून महसूल प्राप्त केला
एसजीपीडीएच्या मैदानावर फेस्ताची फेरी दर वर्षी भरविली जाते. मात्र, 3 लाख रूपयांच्यावर कधीच महसूल मिळाला नाही. मात्र, आपण ताबा घेतल्यानंतर फेस्ताच्या पहिल्या फेरीतून 18 लाख रूपये आणि दुसऱ्यांदा 18 लाख रूपयांचा महसूल प्राप्त केला. यावरून या ठिकाणी गैर व्यवस्थापन चालत होते असे श्री. साळकर म्हणाले.
मासळी विक्रेत्यांनी अतिरिक्त शुल्क दिल्यास सर्व सुविधा त्यांना पुरविण्यात येईल. स्वता मासे विक्रेते अतिरिक्त शुल्क देण्यास राजी झाल्याची माहिती त्यांनी दिली. जर विक्रेत्यांचे सहकार्य मिळाले तर नक्कीच मार्केटचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घाऊक मार्केटचा पहिला टप्पा ऑगस्टमध्ये खुला
मडगावच्या घाऊक मासळी मार्केटचा पहिला टप्पा 15 ऑगस्ट पर्यंत खुला जाणार असल्याचे सांगण्यात आले. घाऊक मासळी मार्केटात मासळीचे दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहणार याची काळजी घेण्यात आली आहे. या मार्केटच्या सोपो कंत्राटसाठी निविदा जारी करण्यात आल्या असून जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीलाच सोपो कंत्राट मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









