कोल्हापूर :
कोल्हापूर शहरात विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: रिलायन्स मॉलच्या पाठीमागून शाहूपुरीकडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाजवळ आणि खानविलकर पेट्रोल पंपासमोरील जयंती नाल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा साठा झाला आहे. या भागातून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि महिला प्रवास करतात. मात्र, साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शाहूपुरीकडे जाणाऱ्या पुलाजवळ कचऱ्याचा प्रचंड ढीग साचलेला असून प्लास्टिक, सडलेले फळ फळावळ आणि बांधकामाचे उरलेले साहित्य यामुळे परिसरात घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्यात येतो आणि महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून नियमित उचल न केल्यामुळे ढीग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे डास, माशा आणि उंदीर वाढून साथीचे रोग फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, खानविलकर पेट्रोल पंपाजवळून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. नागरिक व वाहनचालकांना या दुर्गंधीतून मार्ग काढावा लागत आहे. काही ठिकाणी नाल्यात कचरा टाकला जात असल्याने पाणी साचून डासांची उत्पत्ती होत आहे. स्वच्छता कर्मचारी किंवा कचरा उचलण्यासाठी यंत्रणा नजरेस न पडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. महापालिकेने त्वरित लक्ष घालून संबंधित भागात स्वच्छता मोहिम राबवावी, नियमित कचरा उचलावा आणि नागरिकांना आरोग्यविषयक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असल्या तरी काही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ‘स्वच्छ भारत अभियान‘ आणि ‘स्वच्छ कोल्हापूर‘ यांसारख्या उपक्रमांची केवळ घोषणाच उरली असून प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे.








