संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य ; मोहिमेत नगरपरिषदेने सहभागी व्हावे ; परीट समाजाकडून निवेदन
सावंतवाडी –
स्वच्छतेचे महान पुजारी, समाज सुधारक,संत गाडगेबाबा महाराज यांच्या २३ फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत होणाऱ्या जयंती कार्यक्रमा निमित्त शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेने सहभागी व्हावे अशी मागणी श्री संत गाडगेबाबा महाराज परीट समाज सिंधुदुर्ग व सावंतवाडी तालुका सेवा संघ यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर ,राजू भालेकर यांनी दिली. परीट समाज व तालुका सेवा संघाच्या वतीने रविवार २३ फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा महाराज हे स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते. भजन ,कीर्तन यांच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता विषयक समाज सुधारण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांचे हे व्रत जोपासण्याचे काम परीट समाज करीत आहे. यानिमित्त 23 फेब्रुवारी रोजी सकाळी मच्छी मार्केट , भाजी मार्केट तसेच सावंतवाडी शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत नगरपरिषदेने सहभागी होऊन सहकार्य करावे तसेच शाळा ,हायस्कूल ,कॉलेज ,सामाजिक संस्थांचा समावेश करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी दिलीप भालेकर, राजू भालेकर ,माजी नगरसेविका दिपाली भालेकर, अमिता होडावडेकर , योगेश अरुणकर ,दयानंद रेडकर ,किरण वाडकर, प्रदीप भालेकर ,संजय होडावडेकर ,देवयानी मडवळ , सायली होडावडेकर ,शर्वरी घोडावडेकर ,अनुजा होडावडेकर , भगवान वाडकर, रुपेश माणगावकर आदी उपस्थित होते.









