27 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत महालक्ष्मी यात्रा
वार्ताहर /अगसगे
केदनूर येथे मंगळवार दि. 27 पासून होणाऱ्या श्री महालक्ष्मी (बचनट्टी) देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्राम पंचायत आणि देवस्थान कमिटीच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. प्रति तीन वर्षातून एकदा श्री बचनट्टी महालक्ष्मी देवीची यात्रा भरवली जाते. यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटी व ग्रामस्थ परिश्रम घेतात. यात्रेपूर्वी ग्राम पंचायतीने गावातील गटारींची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता देवस्थान कमिटीने केली आहे. यासाठी ग्रामस्थांनी देखील सहकार्य केले आहे. यात्राकाळात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्राम पंचायत परिश्रम करीत आहे. यात्रा मंगळवार दि. 27 रोजी सुरुवात होणार आहे. यावेळी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 28 रोजी श्री महालक्ष्मी देवीची मिरवणूक गावामध्ये होणार आहे. यापूर्वी सकाळी 6 वाजता अक्षतारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. ही यात्रा दि. 27 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत होणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.









